सोशल मीडियावर गाजताहेत परभणीचे ‘संजय राऊत’

गणेश पांडे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

- संजय राऊत यांच्या चेहऱ्याशी साम्य असणारे ‘लक्ष्मण भदरगे’ परभणी जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी. 
- सेलू (जि. परभणी) येथे एका लग्नसमारंभात भदरगे  यांचा रविराज नावाच्या मुलाने घेतला नृत्य करतानाचा व्हिडीओ.

परभणी : गेल्या महिनाभराच्या राजकीय घडामोडीत सर्वात चर्चेत राहिलेली व्यक्ती म्हणजे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. संजय राऊत यांनी निकालाच्या दिवसापासूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे लावून धरले होते. त्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. परंतु, त्या घडामोडीत परभणीतही दुसरे संजय राऊत चांगलेच गाजले. खऱ्या संजय राऊत व परभणीतील संजय राऊत यांच्या चेहऱ्याशी बरेच साम्य असल्याने ते चर्चेत आले आहेत. त्यांच मूळ नाव ‘लक्ष्मण भदरगे’ असे आहे. ते जिल्हा पोलिस दलात नोकरीस आहेत. सध्या ते परभणी जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत कार्यरत असून एका लग्न सोहळ्यात त्यांचा नृत्य करतानाचा व्हिडीओ राजकीय घडामोडीदरम्यान, सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे त्यांच्या लिखानाच्या शैलीने नेहमीच चर्चेत असतात. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. त्यांच्या दररोजच्या पत्रकार परिषदा, राजकीय प्रतिक्रिया यामुळे खासदार संजय राऊत हे नाव अख्या देशात पोचले. परंतु, राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी होत असताना परभणीतही संजय राऊत यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर गोंधळ घातला. परभणी पोलिस दलातील कर्मचारी लक्ष्मण भदरगे असे त्यांचे नाव.  भदरगे सध्या परभणी जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत कार्यरत आहेत.

सेलू (जि. परभणी) येथे केला व्हिडीओ
या २० सेकंदांच्या व्हिडीओने लक्ष्मण भादरगे यांना दुसरे संजय राऊत करून टाकले. सेलू शहरात एका लग्न समारंभात श्री. भदरगे यांनी एका गाण्यावर नृत्य केले. त्याचा व्हिडीओ रविराज नावाच्या एका मुलाने शूट करून टिकटॉकवर टाकला. क्षणार्धात तो प्रसिद्ध झाला. या व्हिडीओला चार दिवसांत २१ लाख व्हिव्यूज आहेत. शिवाय लाखो युजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आता ‘भदरगे के साथ सेल्फी तो बनती है !’
लक्ष्मण भदरगे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ड्युटीवर आहेत. इथे येणारे रुग्ण असो की त्यांचे नातेवाईक, तरुण असो की लहान मुले, ते दिसले की त्यांच्या सोबत सेल्फी घ्यायला गर्दी करत आहेत. सध्या लक्ष्मण भदरगे यांना भेटायला येणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

 

अभिमानाची बाब
खासदार संजय राऊत हे खूप मोठे नेते आहेत. त्यांची मी बरोबरी करू शकत नाही. केवळ योगायोगाने या व्हिडीओमध्ये त्यांचा व माझा चेहऱ्यात साम्य दिसते, असे लोक म्हणतात. ऐवढ्या मोठ्या नेत्यासोबत माझे नाव जोडले जात आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
- लक्ष्मण भदरगे, पोलिस कर्मचारी, परभणी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani's 'Sanjay Raut' on social media