आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे स्वीकारलं पालकत्व,  दिव्यांग शिक्षिका मीरा कदम यांचा स्तुत्य उपक्रम.

राजेश दारव्हेकर
Thursday, 3 December 2020

स्वतःच्या कमाईतील वाटा आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून अतिशय परिणाम कारकपणे हे वस्तीग्रह चालते. स्वतःच्या दुर्बलतेवर मात करत  त्या अनेक लेकरांसाठी आधारवड ठरल्या आहेत. 

हिंगोली : दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण तडीस नेण्यासाठी दिव्यांग शिक्षिका मीरा कदम यांनी मागील दोन वर्षापासून ४० मुलांचे सेवासदन नावाचे वस्तीगृह सुरू केले आहे. 

स्वतःच्या कमाईतील वाटा आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून अतिशय परिणाम कारकपणे हे वस्तीग्रह चालते. स्वतःच्या दुर्बलतेवर मात करत  त्या अनेक लेकरांसाठी आधारवड ठरल्या आहेत. 

लातूर येथील तांदुळजा या गावी मीरा कदम यांचा जन्म झाला. वयाच्या अठराव्या महिन्यातच त्यांच्या दोन्ही पायांना पोलिओ झाला. आई-वडिलांची परिस्थिती अतिशय हलाखीची पदरात हे अपंग लेकरू.. मीरा कदम यांनी अतिशय खडतर परिस्थितीत धडपडत आपले शिक्षण पूर्ण केले आणि सन २००२ मध्ये हिंगोली याठिकाणी त्या जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्या.सुरुवातीला प्रा.शा. कोंडवाडा त्यानंतर प्रा.शा. सिंनगी नागा व मागील तीन वर्षापासून त्या प्रा. शा.अंतुलेनगर याठिकाणी जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासूनच संघर्ष वाट्याला आलेल्या मीरा कदम यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.

कोरड्या दुष्काळामुळे मनोधैर्य खचलेल्या व आत्महत्येचे विषारी स्वप्न पाहणाऱ्या शेतकरी राजाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आज पर्यंत पाचशेपेक्षा जास्त गावात जाऊन त्यांनी समुपदेशनाचे कार्य केले आहे. 

दोन्ही पायाने दिव्यांग असतानाही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी सेवासदन नावाचे वस्तीगृह त्यांनी सुरू केले आणि या लेकरांना आधार देण्याचा प्रयत्न केला. कोरोणाच्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा या मुलांचा आधार काढून न घेता त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही व त्यांना मायेचा आधार दिला.सेवासदन मधील मुलांना अभ्यासक्रमा बरोबरच योग शिक्षण, कॉम्प्युटर शिक्षण तसेच विविध खेळांचे शिक्षण दिले जाते. आज पर्यंत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे पती धनराज कदम यांचे मोलाचे सहकार्य त्यांना वेळोवेळी लाभते. एका दिव्यांग व्यक्तीला जीवनसाथी म्हणून स्वीकारून त्यांना सन्मानाची वागणूक देऊन धनराज कदम यांनी सुद्धा  समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parenting of children from a suicidal farmer family accepted, commendable initiative of Divyang teacher Meera Kadam. hingoli news