esakal | सेनगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन बेड नसल्याने रुग्णांची हेळसांड

बोलून बातमी शोधा

सेनगाव रुग्णालय
सेनगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन बेड नसल्याने रुग्णांची हेळसांड
sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन बेड उपलब्ध नसल्यामुळे कोरोनाचा गंभीर आजार झाल्यास रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे.

कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत चालला असून प्रशासन व लोकप्रतिनिधीकडून ऑक्सीजन बेड व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. बहुतांश नागरिकांना वेळेत बेड मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णाचे जीव धोक्यात येत आहेत. सेनगाव तालुक्यात देखील आता कोरोना रुग्ण संखेत खुप वाढ होत आहे. तालुक्यातील बारा गावे कोरोना बाधित असून पहिल्या लाटेमध्ये ३२८ रुग्ण होते तर २० मार्चनंतरच्या दुसऱ्या लाटेमध्ये जवळपास ५५८ कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आढळून आली. तालुक्यामध्ये बहुतांश गावामध्ये अद्याप कोरोना चाचण्या झालेल्या नाहीत त्यामुळे स्पष्ट आकडेवारी आलेली नसल्याचे दिसून येत आहे. अनेक गंभीर रुग्णाची मृत्युशी झुंज सुरु आहे. अशात रुग्णाच्या नातेवाईकांकडून ऑक्सीजन बेडसाठी प्रशासन व लोकप्रतिनिधिकडे विनंती केली जात आहे.

सेनगाव हे तालुक्याचे ठिकाण असून येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन बेडची आवश्यकता असताना देखील या ठिकाणी ऑक्सीजन बेड उपलब्ध नसल्यामुळे कोरोना रुग्णांची हेळसांड होत असल्याचे पहायला मिळत आहे. तालुक्यातील कवठा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ३६ ऑक्सीजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सीजन बेड उपलब्ध नसल्याने नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. कोरोनाची दूसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर समजली जात आहे. अनेकांना आपले प्राण सुध्दा गमावण्याची वेळ येत आहे. सेनगाव येथे ऑक्सीजन बेडची अत्यंत गरज असताना देखील कुणीही हा विषय गांभीर्याने घेतलेला दिसून येत नाही. त्यामुळे सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात जवळपास १०० ऑक्सीजन बेड उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांतुन जोर धरु लागली आहे.

येथे ऑक्सीजन बेडची आवश्यकता आहे. मात्र ते नियोजन जिल्हास्तरावरुन होत आहे. जवळच्या कवठा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ३६ ऑक्सीजन बेड उपलब्ध आहेत.

- डॉ. सचिन राठोड, वैद्यकीय अधीक्षक, सेनगाव, जिल्हा हिंगोली.

संपादन- प्रल्हाद कांबळे