विद्यार्थिनीच्या प्रेमात पडलेल्या शिक्षकाची धुलाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

विद्यार्थिनीच्या प्रेमात पडलेल्या एका शिक्षकाला तिच्या नातेवाइकांनी मंगळवारी (ता. एक) सकाळी बेदम चोप दिला. हा शिक्षक शाळेत प्रवेश करण्यापूर्वीच नातेवाइकांनी त्याला रस्त्यावरच गाठले.

मुरूड(जि. लातूर ): विद्यार्थिनीच्या प्रेमात पडलेल्या एका शिक्षकाला तिच्या नातेवाइकांनी मंगळवारी (ता. एक) सकाळी बेदम चोप दिला. हा शिक्षक शाळेत प्रवेश करण्यापूर्वीच नातेवाइकांनी त्याला रस्त्यावरच गाठले. त्यानंतर तब्बल अर्धा तास सर्वजण शिक्षकाची धुलाई करीत होते. यात महाविद्यालयीन युवकांनीही हात धुऊन घेतला.

कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन शिक्षकाची सुटका करून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एकीकडे शाळेच्या परिपाठाची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे शिक्षकाची धुलाई सुरू होती.

 
या घटनेची सुरवात ढोकी (ता. उस्मानाबाद) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून झाल्याने विद्यार्थिनीच्या नातेवाइकांना तिकडे तक्रार करण्याचा सल्ला दिल्याची माहिती येथील सहायक पोलिस निरीक्षक टी. आर. भालेराव यांनी दिली. येथील एका शाळेत मागील दोन वर्षांपासून एक शिक्षक विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत आहेत. त्याचे शाळेतील एका विद्यार्थिनींसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे.

यातच ही मुलगी सोमवारी (ता. 30) गावातून बेपत्ता झाली व ती शिक्षकासोबत होती, या संशयावरून नातेवाईक चिडले. सर्वांनी शिक्षकाला शाळेत जाण्यापूर्वीच रस्त्यावर गाठले व यथेच्छ धुलाई केली. अंगावरील कपडे फाटेपर्यंत नातेवाईक शिक्षकाची धुलाई करीत होती. शाळा भरण्याची वेळ असल्याने विद्यार्थी आणि बघ्यांनी तिथे मोठी गर्दी केली. काही महाविद्यालयीन युवकांनीही शिक्षकाला चोप देत हात धुऊन घेतले

 तब्बल अर्धा तास मारहाण सुरू होती. या मारहाणीचा व्हिडिओ तयार करून अनेकांनी तो दिवसभर सोशल मीडियावर फिरवला. शिक्षकाला मारहाण सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिक्षकाची जमावाच्या तावडीतून सुटका करून त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

नातेवाइकांनी मुलीला शिक्षकाने पळवून नेल्याचा आरोप केला होता. ज्या ठिकाणाहून पळवून नेल्याचा आरोप होता ते गाव मुरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नसल्याने त्यांना ढोकी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन ढोकी पोलिसांना पुढील कारवाईच्या सूचना दिल्याचे श्री. भालेराव यांनी सांगितले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people beat teacher who fall in love with student