केज - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मस्साजोग ग्रामस्थांसह सामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. मात्र संवेदना बोथट झालेले राज्य शासनाने न्याय देण्यासाठी साधारणपणे तीन महिन्यांचा विलंब लावला आहे.
त्यातच या गुन्ह्यातील आरोपींनी मानवतेला लाजवेल अशा पद्धतीने अपहरणानंतर तब्बल तीन तास बेदम मारहाण करून अत्यंत क्रूरतेने निर्दयपणे हत्या केल्याचे फोटो समाज माध्यमातून समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचे पाहून सामान्य माणसाचे मन सुन्न झाले आहे. त्यामुळे बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले.
त्यामुळे मंगळवारी (ता. ०४) केज शहर व ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळून व रस्त्यावर टायर जाळून राज्य शासनाच्या विरोधात निषेध नोंदवत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून अत्यंत निर्दयपणे निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी रास्तारोको, जलसमाधी, पाण्याच्या टाकीवर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात आक्रोश मोर्चा, व अन्नत्याग आंदोलन करावे लागले.
या गुन्ह्यातील वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असूनही जनतेचा विरोध त्यांनाही त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. या प्रकरणी जिल्ह्यातील खासदार बजरंग सोनवणे, भाजपाचे आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके व आमदार नमिता मुंदडा यांनी लोकसभा व विधानसभेच्या सभागृहात हा प्रश्न पोटतिडकीने उपस्थित केला.
तरीही संवेदना बोथट झालेल्या राज्य शासनाने सबळ पुराव्याचे कारण सांगून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. मराठा योद्धा मनोज जरांगे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व जनतेच्या न्यायाचा लढा पाहून या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी व सीआयडी कडे सोपविला.
हे हत्या प्रकरण उचलून धरण्यात विविध वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्याची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. या तपास यंत्रणेच्या तपासात हत्येच्या दरम्यानचे आरोपींनी काढलेले फोटो, व्हिडिओ व फोनचे सीडीआर तपासले. यातून धक्कादायक बाबी समोर आल्या. याप्रकरणी सीआयडीने या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
त्यानंतर या तपासातील फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाल्याचे पाहून सामान्य जनतेत संतापाची लाट पसरली. त्यामुळे मंगळवारी बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील घटना असल्याने केज शहर व ग्रामीण भागात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त करत धनंजय मुंडे यांचा राजीनामा, आरोपींना फाशीची शिक्षा, आरोपींना मदत करणारे व आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सह आरोपी करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार अशोक भंडारे यांना देण्यात आले.
समाज माध्यमांवर व्हायरल फोटो पाहून सामान्य जनतेत तीव्र संताप -
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या वेळी आरोपींनी काढलेले फोटो व व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचे पाहून सामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे. अशा पद्धतीने अपहरण करून हत्या करण्यात आल्याने माणूसकी शिल्लक असलेल्या संवेदनशील जनतेचेच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.
मराठा योद्धा मनोज जरांगे व खासदार बजरंग सोनवणे यांची मस्साजोगला भेट -
समाज माध्यमांवर व्हायरल झालेले फोटो पाहून देशमुख कुटुंबीयांची झालेली अवस्था पाहून मनोज जरांगे व खासदार बजरंग सोनवणे यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला. जोपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा देऊन न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण देशमुख कुटुंब व मस्साजोग ग्रामस्थांच्या सोबत राहणार असल्याचा विश्वास दिला.
प्रतिक्रिया -
"समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचे फोटो पाहून काय बोलावं आणि काय करावे, ते सुचत नाही. ही सर्व घटना व त्यातील फोटो व व्हिडिओ राज्य शासनासह गृहमंत्रालयाला माहित असूनही राजीनामा घ्यायला विलंब केला. समाजाने फोटो बघून संताप व्यक्त केल्यावर राजीनामा घेतला जातो हे दुर्दैवी आहे.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हळहळली आहे. एका मंत्र्याच्या पाठबळामुळे गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत होऊन जनतेला वेठीस धरले जाते. परंतू जोपर्यंत संतोष आण्णांना न्याय मिळत नाही व अशाप्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधातील लढा सुरूच राहील.
- धनंजय देशमुख, (दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे लहान बंधू)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.