पिंपळदरी हद्दीतील गुंडांची टोळी तीन जिल्ह्यातून हद्दपार, परभणीत निघाले आदेश

गणेश पांडे
Wednesday, 25 November 2020

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम तालुक्यासह अहमदपूर (जि.लातुर) परळी (जि.बीड) तालुक्यातून तीन जणांच्या टोळीने हैदोस घातला होता. या टोळीस पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी बुधवारी (ता.२४) हद्दपार करण्याचे आदेश बजावले.

परभणी ः विविध गुन्ह्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या पिंपळदरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंडांच्या टोळीस पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी बुधवारी (ता. २४) हद्दपार करण्याचे आदेश बजावले.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम तालुक्यासह अहमदपूर (जि.लातुर) परळी (जि.बीड) तालुक्यातून तीन जणांच्या टोळीने हैदोस घातला होता. पिंपळदरी ठाण्याच्या हद्दीत व इतरत्र स्वतःच्या टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी टोळीप्रमुख विलास ज्ञानोबा मुंडे याच्यासह मंगेश शिवाजी मुंडे, बालाजी वैजनाथ मुंडे हे नागरिकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण करून त्यांची जिवित किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोचविणे, महिलांची छेड काढणे, महिला, मुलींवर बलात्कार करणे, जीवे मारण्याच्या उद्देशाने घातक शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी करणे, घातक शस्त्रानिशी फिरणे, जीवे मारण्याची धकमी देणे, गैरकायद्याची मंडळी जमवून शस्त्राजवळ बाळगुन दुखापत करणे, घरफोडी, चोरी आदी गुन्हे २०१३ पासून आजतागायत टोळीतील सदस्यांमार्फत वैयक्तिक किंवा एकत्रितपणे गुन्हे घडवून आणून सर्वसामान्य लोकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण केला होता.

टोळीविरूध्द नऊ गुन्हे दाखल

या टोळीविरूध्द नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरूध्द हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला. यात टोळीप्रमुख विलास ज्ञानोबा मुंडे याच्यासह मंगेश शिवाजी मुंडे, बालाजी वैजनाथ मुंडे यांना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व पालम तालुका व त्यालगतच्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका व बीड जिल्ह्यातील परळी तालुका व तालुक्याच्या हद्दीतुन हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिले.  

अ‍ॅटोमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्यांविरूध्द कारवाई

परभणी ः घरगुती गॅस अ‍ॅटोमध्ये भरताना दोघांना रंगेहात पकडले. ही कारवाई परभणीतील मदीनानगर परिसरात नानलपेठ पोलिसांनी मंगळवारी (ता.२३) रात्री केली. सय्यद दादन सय्यद खलील, नारायण रामचंद्र हरकळ या दोघांना नानलपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. नानलपेठचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांना वाहनात घरगुती गॅस भरून दिला जात असल्याची माहिती समजली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. नानलपेठ पोलिस पथकाने मदिनानगर परिसरात छापा मारला असता तेथे विनापरवानगी घरगुती अ‍ॅटोमध्ये भरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाने अ‍ॅटोसह घरगुती गॅस सिलिंडरच्या पाच टाक्यायासह अन्य साहित्य असा एकूण एक लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत फौजदार श्री.पुयट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संपादन ः राजन मंगरुळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpaldari gangsters deported from three districts and ordered to leave for Parbhani