संपर्कात आले असाल तर माहिती द्या अन्यथा दंडात्मक कार्यवाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचा इशारा

परभणी : दिल्ली येथील निजामुद्दीन येथील मशिदीत झालेल्या धार्मिक कार्यक्रमात गेलेल्या लोकांच्या संपर्कात कोणी आले असेल तर त्याची जिल्हा प्रशासनास माहिती देऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी, अन्यथा दंडात्मक कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिला आहे.

निजामुद्दीन दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास राज्यातील विविध भागांतून नागरिकांनी हजेरी लावली असून सदर घटनेनंतर मशीद निजामुद्दीन दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुशंगाने परभणी जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी मशीद निजामुद्दीन दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास उपस्थिती लावली होती किंवा मरकज मशीद निजामुद्दीन दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास उपस्थिती असलेल्या नागरिकांच्या संपर्कात आले असतील अशा नागरिकांनी स्वतःची जिल्हा शासकीय रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी व तपासणीनंतर दिलेल्या सल्ल्याचे कटाक्षाने पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (०२४५२ -२२३४५८) किंवा आशिष आहेर (९६८९९९७११३) या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - परभणीत १७१ जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

अशा नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही
परभणी जिल्ह्यातील नागरिक स्वतःहून तपासणी करणार नाहीत किंवा परभणी जिल्ह्यातील जे नागरिक मरकज मशीद निजामुद्दीन दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नागरिकांच्या किंवा कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्णांच्या संपर्कात आले असतील या बाबतची माहिती जिल्हा प्रशासनास देणार नाहीत. अशा नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.

हेही वाचा...
खोटी चित्रफितप्रकरणी गुन्हा
सेलू (जि.परभणी):
सेलू शहरातील एका तरुणावर मोबाईलद्वारे खोटी चित्रफित प्रसारित केल्याबद्दल रविवार (ता. पाच)सेलू पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. एका तरुणाने भाजी व फळ विक्रेते यांच्यावर शहरात खळबळ उडून देणारी खोटी चित्रफित मोबाईल वर  तयार करुन प्रसारित केली. दरम्यान अब्दुल रोफ अब्दुल मन्नान (राहणार बागवान गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलिस कर्मचारी रामा हातागळे करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Please contact if you have been in touch Otherwise punitive action,parbhani news