पंतप्रधानांच्या हस्ते होणार "ऑरिक'चे लोकार्पण

आदित्य वाघमारे
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

"दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर' (डीएमआयसी) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेंद्रा येथील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण शनिवारी शेंद्रा येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य आणि केंद्रातील मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. सात) होणार आहे. याशिवाय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला मेळाव्याचे आयोजनही याच वेळी करण्यात येणार आहे. 

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण शनिवारी शेंद्रा येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य आणि केंद्रातील मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोनच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचे आगमन होणार असून, ते एकाच वेळी या दोन्ही कार्यक्रमांना संबोधित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याअनुषंगाने शुक्रवारी (ता. 30) दुपारी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, आयुक्‍त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ऑरिक येथील व्यवस्थेची संयुक्त पाहणी केली होती. शेंद्राचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे गेले आहे. या प्रकल्पाचा दुसरा टप्पा नजीकच्या काळात सुरू होणार असून, तो 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी आपली मुख्यालये न सोडण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत. 

गुंतवणूक पटकाविण्यात देशात अव्वल 
ऑरिकमध्ये आतापर्यंत पाच लाख चौरस मीटरपेक्षा जास्त मापाची जमीन भूखंडरूपाने 50 पेक्षा अधिक कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यातील कोटऑल फिल्म, ऍरो टुल्स या कंपन्यांनी उत्पादनाचा श्रीगणेशा केला आहे. देशातील डीएमआयसी प्रकल्पांना मात देत शेंद्रा नोडने पहिला अँकर प्रकल्प पटकाविला होता. ह्योसंग या अँकर प्रकल्पाची उत्पादन घेण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. देशातील विद्युत उपकरणांसाठी लागणारे विशेष स्टील तयार करणाऱ्या रशियन एनएलएमके या कंपनीनेही भूखंड घेतला आहे. 3600 कोटींची सर्वाधिक गुंतवणूक पटकाविणारा नोड म्हणून औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडचा केंद्र सरकारने गौरवही केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi to inaugurate first phase of AURIC