पीएमसी बॅंकेचे मराठवाड्यातील व्यवहार ठप्प, पैशांसाठी खातेदारांची गर्दी

प्रकाश बनकर
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पीएमसी बॅंकेवर सहा महिने व्यवहार बंद राहणार असल्याचा संदेश मंगळवारी (ता.24) बॅंकेतर्फे खातेदारांना पाठविण्यात आला आहे. यामूळे पै- पै जमा करून बॅंकेत ठेवलेले पैसे निघत नसल्यामूळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत

 
औरंगाबाद
: आर्थिक अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बॅंकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बॅंकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. या बॅंकेच्या औरंगाबादेतील दोन्ही शाखांत ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत.

सहा महिने व्यवहार बंद राहणार असल्याचा संदेश मंगळवारी (ता.24) बॅंकेतर्फे खातेदारांना पाठविण्यात आला आहे. यामूळे पै- पै जमा करून बॅंकेत ठेवलेले पैसे निघत नसल्यामूळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आपल्या खात्यावरील पैसे मिळावेत यासाठी खातेदारांनी दोन्ही शाखेत गर्दी केली होती. 

-
रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर "प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन" घेतली आहे. यामूळे बॅंकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्याशिवाय खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. मराठवाड्यात बॅंकेच्या तीन शाखा आहेत. त्यातील दोन शाखा औरंगाबादेत आहेत. तर एक शाखा नांदेडला आहे. या तिन्ही शाखेत हजारो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत.

या बॅंकेचे नियमीत अपडेट एसएमएसव्दारे येतात. आजही बॅंकेचा एसएमएस आला. नियमित संदेश असेल म्हणून, याकडे दुर्लक्ष केले. मात्र बॅंकेच्या मॅनेजरचा फोन आला, ते म्हणाले," तुम्हाला माहित आहे का तुमचे खाते सहा महिन्यांसाठी बंद राहणार आहे. हे एकुण मला धक्‍काच बसला. माझे सर्व व्यवहार याच बॅंकेच्या माध्यमातून होतात. चालू आणि बचत असे एकूण अकरा खाते या बॅंकेत आहे. दिवाळीच्या तोंडावर हा प्रकार झाल्यामूळे माझ्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. आता पुढे काय करावे हेच सूचत नाही. 
- कृणाल मालाणी, खातेदार 

बॅंकेचे व्यवहार सहा महिने बंद राहतील असा सकाळीच एसएमएस आला, हे पाहण्यासाठी आज जालना रोडवरील शाखेत आलो. येथे आल्यानंतर फक्‍त एक हजार रुपये काढता येणार असल्याचे सांगण्यात आले. माझे खुलताबादला घराचे बांधकाम सुरु आहे. यासाठी होम क्रेडीटवरुन 86 हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. माझ्या भावाचेही खाते यांच बॅंकेत आहे. भावाच्या खात्यावर 50 हजार रूपये टाकले होते. तेही आता काढता येणार नाही. यासह बजाज फायनान्सचे आठ ईएमआय याच बॅंकेतून होते. याचा मोठा फटका बसणार आहे. 
- किरण गोरे-खातेदार. 
--------- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pmc bank transactions in Marathwada stops . Account holders rushed to bank for cash