esakal | कोविड उपचार केंद्रातून गुन्हेगार रूग्णाचे पलायन; पोलीसांकडून शोध सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

covid centre

शहराजवळील पिसेगाव कोविड केंद्रातून नांदुरघाट येथील एका ३१ वर्षीय कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णाने पलायन केल्याचा प्रकार गुरूवार (ता.२७) रोजी आरोग्य प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. उपचारादरम्यान पळून गेलेला रूग्णावर पोलीसात दोन गुन्हे दाखल असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कोविड उपचार केंद्रातून गुन्हेगार रूग्णाचे पलायन; पोलीसांकडून शोध सुरू

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (बीड) : शहराजवळील पिसेगाव कोविड केंद्रातून नांदुरघाट येथील एका ३१ वर्षीय कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णाने पलायन केल्याचा प्रकार गुरूवार (ता.२७) रोजी आरोग्य प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. उपचारादरम्यान पळून गेलेला रूग्णावर पोलीसात दोन गुन्हे दाखल असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तालुक्यातील नांदुरघाट येथील पळून गेलेल्या रूग्णावर पोलीसात दोन गुन्हे दाखल असल्याने त्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक गोविंद एकीलवाले, पोलीस नाईक श्रीमंत उबाळे, तुळशीराम जगताप, पोलीस शिपाई गणेश नवले व हडके यांनी सापळा रचून नुकतेच ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यास तपास कामी केज पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यास मंगळवारी न्यायालयासमोर केले असता जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याची कोरोना अॅन्टेजेन टेस्ट करण्यात आली. त्यात त्यांचा तपासणी अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला होता. त्यामुळे त्यास कोविड उपचार केंद्रात उपचारासाठी बुधवारी दुपारी साडेतीन वाजता दाखल करण्यात आले.

मात्र त्याने त्या ठिकाणाहून रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तात्काळ आरोग्य विभागाकडून याबाबत केज पोलीसांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस नाईक मुकुंद ढाकणे व शिवाजी सानप यांना तो नांदुरघाट येथे राहत असलेल्या वस्तीवर पाठवून त्या फरार रूग्णाच्या संपर्कात न येण्याचे आवाहन केले आहे. सध्या पोलीस फरार रूग्णाचा शोध घेत असून तो नेमका येथून कसा पळून गेला याचा पोलीस तपास करीत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले