येथे बनावट दारूचा अड्डा पोलिसांनी केला उद्ध्वस्त

photo
photo

कळमनुरी(जि. हिंगोली) : कळमनुरी पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या पिंपळदरी येथे गोवा येथील स्वस्त दारू आपल्याकडे विक्री होणाऱ्या महागड्या दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये भरून विक्री केली जात होती. स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता.२५) या अड्ड्यावर छापा टाकून हा बनावट दारू अड्डा उद्ध्वस्त करून तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच ४५ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे एका शेतातील आखाड्यावर बाहेर राज्यातील स्वस्त दारू महागड्या विदेशी दारूच्या बॉटलमध्ये भरून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार, उपनिरीक्षक शिवसांभ घेवारे, किशोर पोटे, संभाजी लेकुळे, आशिष उंबरकर, राजू ठाकुर, किशोर सावंत, दीपक पाटील, प्रशांत वाघमारे, तुषार ठाकरे यांनी बुधवारी(ता.२५) पिंपळदरी येथील शेख बुऱ्हाण शेख कासीम यांच्या शेतातील घराची तपासणी केली. 

विदेशी बॉटलमध्ये स्वस्त दारूचा भरणा

या वेळी राज्यात बंदी असलेली गोवा येथील स्वस्त दारू आपल्याकडे पिण्यात येणाऱ्या विदेशी दारूच्या बाटल्यांमध्ये भरून त्याला बूच लावले जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या प्रकरणी आपल्याकडे विक्री होत असलेल्या विदेशी दारूच्या पाच पोते रिकाम्या बॉटल, इम्पेरियल ब्लू असे लेबल असलेल्या १०५ भरलेल्या बॉटल (किंमत १४ हजार ७०० रुपये, मॅकडॉल नंबर १ दारू भरलेले १९० बॉटल (किंमत २८ हजार ५०० रुपये), रियल एक्स्ट्रा सात स्मूथ व्हिस्की असे लेबल असलेल्या ७५० एमएलच्या रिकाम्या व सिल पॅक केलेल्या २० बॉटल, इंपिरियल ब्लू व मॅकडॉल नंबर १ दारूच्या बाटल्या सिल पॅक करण्याकरिता लागणारी बूच आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांभ घेवारे यांच्या तक्रारीवरून विवेक पांपटवार (रा. आखाडा बाळापूर), शेख बुऱ्हाण शेख कासिम, गजानन रिठे (रा.पिंपळदरी तालुका औंढा नागनाथ) यांच्याविरोधात कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

अशी भरली जात होती दारू

पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला तेव्हा पोलिसही आवाक झाले. गोवा राज्यातील स्वस्त आसलेली दारू पाण्याच्या मोठ्या जारमध्ये टाकली जात होती. त्यातून नळाच्या तोटीद्वारे आपल्याकडे विक्री होणाऱ्या विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये भरली जात होती. त्यानंतर बॉटलला महागड्या कंपनीचे झाकण लावण्यात येत होते. पोलिसांनही हे सर्व साहित्य जप्त केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com