तहसीलदार महेश सावंतसह दोघांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कुळाच्या जमिनीसंदर्भातील निकालासाठी लाचेचे प्रकरण 

औरंगाबाद : कुळाच्या जमिनीसंबंधी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी तीस लाखांची लाच मागितल्याप्रकरणात तसेच एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या तहसीलदारासह वकील व अन्य एकास शुक्रवारपर्यंत (ता. 4) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी सोमवारी (ता. 30) दिले. 

तहसीलदार महेश सावंत (41, रा. ईटखेडा), वकील कैलास लिपने (38, रा. मित्रनगर, एन-4) व बद्रीनाथ भवर (35, रा. भानुदासनगर, त्रिमूर्ती चौक) अशी आरोपींची नावे आहेत. प्रकरणात रुस्तुम घनवट (60, रा. पांगरा ता. पैठण) यांनी तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवारी (ता.29) पैठण तहसील कार्यालयात सापळा रचून ऍड. लिपने व भवर याला पकडले होते. प्रकरणात पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

तिघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी आरोपींच्या आवाजाचे नमुने घेणे बाकी असुन गुन्ह्यासंबंधीचे पुरावे हस्तगत करणे आहे. आरोपींच्या घर झडतीत काही मालमत्ता मिळाली असून आणखी मालमत्ता मिळण्याची शक्‍यता असल्याने त्याअनुषंगाने तपास करण्यासाठी आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. यावर न्यायालयाने वरील आदेश दिला. ऍड. देशपांडे यांना ऍड. सिद्धार्थ वाघ यांनी सहाय्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police custudy to taluka magistrate with two accuse