पोलिस कुटुंबीयांच्या घरांची दैना सुटणार

जालिंदर धांडे
बुधवार, 3 जुलै 2019

अशी असणार नवीन इमारत
शहरातील पोलिस मुख्यालय परिसरातील जुन्या पोलिस वसाहतीची इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये २४१ पोलिस कर्मचारी निवासस्थान निर्माण करण्यात येणार आहे. पोलिस मुख्यालयाची इमारतही नवीन उभारण्यात येणार आहे. यामुळे सध्याच्या पोलिस मुख्यालयाचा चेहरामोहरा बदलणार आहे.

बीड - शहरातील नगर रोड परिसरातील प्रलंबित पोलिस वसाहतीचा प्रश्‍न मार्गी लागला असून आठवडाभरात जुन्या वसाहतीच्या ठिकाणी नवीन इमारतीचे काम होणार आहे. पोलिस वसाहतीमुळे शहरातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. येथील वसाहतीच्या दुरवस्थेबाबत ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता. यामुळे सदरील वसाहतीचा प्रश्न लवकर मार्गी लागला आहे. आठवडाभरात नवीन पोलिस वसाहतीचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ‘सकाळ’ला दिली.

सध्या शहरात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस व नगर रोड परिसरात एक आहे. या दोन्हीही ठिकाणी पोलिस कर्मचारी राहत आहेत; परंतु अनेक वर्षांपासून इमारतीची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन ‘सकाळ’ने ‘पोलिस घरातच असुरक्षित’ या मथळ्याखाळी वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेऊन अखेर येथील पोलिस वसाहतीचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

सध्या येथे राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निवासस्थान खाली करण्याचे सांगितले आहे. येथील जुनी इमारत पाडून नवीन वसाहत उभारण्यात येणार आहे. यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

४० वर्षांपूर्वीची वसाहत होणार सुसज्ज
पोलिस कर्मचाऱ्यांना नवीन वसाहत होईपर्यंत बाहेर रूम करून राहावे लागणार आहे. आठ दिवसांपासून वसाहतीत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची दुसरीकडे घर शोधताना धावपळ दिसून येत आहे. ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या पोलिस वसाहतीची इमारत कमकुवत झाल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांस त्या ठिकाणी राहण्यास विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. या प्रश्‍नी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी वैयक्तिक लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे कामासाठी ५२ कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकर नवीन इमारतीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

पोलिस वसाहतीचा प्रश्‍न मार्गी लागणार असून, या ठिकाणी २४१ घरे बांधण्यात येणार आहेत. यासह पोलिस मुख्यालयाची इमारतही बांधण्यात येणार आहे. नवीन इमारत उभारल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. लवकरच या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. 
- जी. श्रीधर, पोलिस अधीक्षक, बीड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Family Home Issue Solve