सात विद्युत पंपासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; ग्रामीण पोलिसांची कामगिरी

Police have nabbed those who stole electric pumps from wells and bores in Wasm.jpg
Police have nabbed those who stole electric pumps from wells and bores in Wasm.jpg

वसमत (हिंगोली ) : तब्बल सहा महिन्यांपासून विहिरी व बोअरमधील विद्युत पंप चोरुन शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणणाऱ्या दोन आरोपींच्या रविवारी (ता. ११) ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळीत ७ विद्युत पंप जप्त केले. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुका व शिवारात पुर्णा पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी मिळत असल्याने सर्व जमीन जवळपास सिंचनाची आहे. त्यामुळे या परिसरात विविध फळबागेसह भाजीपालाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. सर्व जमीन बागायती असल्याने सहाजिकच ठिबक सिंचनासह विविध कंपनीच्या लहान मोठ्या क्षमतेचे विद्युत पंप विहिरीवर आणि बोअरमध्ये  बसवले जातात. याबरोबरच अनेक शेतकरी शेतातील जळून गेलेल्या कॅनॉलमध्ये विद्युत पंप बसून शेतीला पाणी देत असतात. मात्र मागील सहा महिन्यापासून चोरट्यांनी विद्युत पंप चोरून नेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते. 

नैसर्गिक संकटाने हवालदिल झालेला शेतकरी विद्युत पंप चोरीच्या घटनांमुळे पुरता मेटाकुटीस आला होता. विद्युत पंप चोरीच्या घटना घडत असल्या तरी यातील अनेक शेतकऱ्यांनी पोलिसांचे वांदे नको म्हणून तक्रारी दिल्या नाहीत. परंतु तालुक्यातील फाटा येथील शेतकरी बाबाराव बाजीराव काकडे यांनी फाटा शिवारातील कॅनलवर लावलेले विद्युत पंप चोरीला गेल्याची फिर्याद 2 ऑक्टोंबर 2020 रोजी वसमत ग्रामीण पोलिस स्टेशन येथे दिली होती. यानंतर ग्रामीण पोलिसांनी विद्युत पंप चोरी करणाऱ्या चोरट्यावर लक्ष ठेवून होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, मधुकर आडे, अंबादास विभुते, भुजंगराव कोकरे आदीच्या पथकांनी रविवारी सापळा रचून विद्युत पंप चोरी करणाऱ्या ज्ञानेश्वर मारुती क्षीरसागर व नामदेव बालाजी कदम राहणार दोघेही जवळा खंदारबन तालुका वसमत यांच्या मुसक्या आवळल्या. 

पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या दोघांनी मागील सहा महिन्यापासून विद्युत पंप चोरी करीत असल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या दोन बोरमधील विद्युत पंप व 5 विहिरीमधील विद्युत पंप असे एकूण सात विद्युत पंप त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. सदरील चोरट्यांकडून यापेक्षा जास्त विद्युत पंप चोरी केले असल्याचा संशय व्यक्त केला जात असून आणखीन चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. बाबाराव काकडे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com