
संपूर्ण महाराष्ट्रासह गंगाखेड शहरात गुटखा बंदी असताना सुद्धा खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे.
गंगाखेड (परभणी) : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थ गुटखा, पानमसाला आदींवर बंदी घातलेली आहे. परंतु गंगाखेड शहरात खुलेआम गुटख्याची विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपविभागीय अधिकारी यांनी गुटख्याचा साठा असलेल्या ठिकाणी (ता.31) ऑक्टोबर शनिवार रोजी छापा मारल्याची घटना घडली.
संपूर्ण महाराष्ट्रासह गंगाखेड शहरात गुटखा बंदी असताना सुद्धा खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. यापूर्वीही शहरातील गुटख्याच्या ठोक व्यापाऱ्यांवर कार्यवाही झालेली असताना या दुकानदारांकडून गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी बलराज लंजिले व त्यांच्या पथकाने शनिवार सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जेंदीपुरा व गुलजार कॉलनी येथील घरात छापा मारला.
या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांसह गुटखा, पानमसाला, राजनिवास, विमल, गुटखा, वजीर गुटका, एक्का गुटका, गोवा, मुसाफिर जाफराणी जर्दा आदि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले असून याची किंमत सात लाख 73 हजार 510 रुपये रुपये एवढी आहे. पोलीस कर्मचारी निलेश दिगंबर भुजबळ यांच्या फिर्यादीवरून नदीम खान मोइज खान, असेफ खान उस्मान खान, आरिफ खान, उस्मान खान, शेख हकीम, शेख नमीयोद्दीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे हे करत आहेत. अवैधरित्या गुटखा साठा केल्या प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून यापैकी तीन आरोपींना अटक केली. व एक आरोपी फरार असून तीन आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले