पोलिसांनी केल्या बेवारस ३० दुचाकी जप्त 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 23 जानेवारी 2020

वजिराबाद पोलिसांनी कारवाई करत आपल्या हद्दीत विविध ठिकाणी बेवारस पडलेल्या ३० दुचाकी जप्त केल्या. त्यातील आठ दुचाकी मालकांच्या स्वाधीन केल्या.

नांदेड : शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना मागील काही दिवसांपासून सुरूच आहेत. यावर आळा बसावा व दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. अशाच पद्धतीने वजिराबाद पोलिसांनी कारवाई करत आपल्या हद्दीत विविध ठिकाणी बेवारस पडलेल्या ३० दुचाकी जप्त केल्या. त्यातील आठ दुचाकी मालकांच्या स्वाधीन केल्या. उर्वरीत दुचाकी मालकांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. 

शहर व जिल्ह्यात दुचाकी चोरांनी आपले डोके वर काढले असून मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांवर आळा बसविण्यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांनी शहरातील सर्वच ठाणेदारांना सुचना दिल्या. यावरून वजिराबादचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी त्यांचे सहकारी सहाय्य्क पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे यांच्यावर दुचाकी चोर पकडण्‍याची जबाबदारी टाकली. 

येथे क्लिक करा - जमीन वाटप (पोट हिस्सा) करणे झाले सोपे...कसे ते वाचा...

वजिराबाद गुन्हे शोध (डीबी) पथकाची कामगिरी

श्री. पुंगळे यांनी आपले सहकारी पोलिस हवालदार दत्ता जाधव, शरद चावरे, गजानन किडे, बबन बेडदे, संतोष बलुरोड, जसप्रितसिंग शाहू, मिर्झा बेग, गामाजी कानगुलवार, चंद्रकांत बिरादार यांना सोबत घेऊन वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घातली. यावेळी त्यांना विविध ठिकाणी बेवारस अवस्थेत मागील काही दिवासांपासून उभ्या असलेल्या दुचाकी दिसल्या. त्यांनी आपल्या वरिष्ठांना ही माहिती देऊन जवळपास २८ बेवारस दुचाकी जप्त करून वजिराबाद पोलिस ठाण्यात लावल्या. तर एका आरोपीकडून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या. 

हेही वाचाशंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम

विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

जप्त केलेल्या ३० दुचाकी पैकी काही दुचाकी मालकांना परत केल्या. जप्त केलेल्या दुचाकी ह्या नांदेड ग्रामिण, शिवाजीनगर, इतवारा, कुशीगुडा (हैद्राबाद) आणि भोसरी (पुणे) येथील गुन्हे दाखल असलेल्या सापडल्या. त्या दुचाकी संबंधीतांना परत केल्या असून २७ दुचाकी मालकांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. शिवले यांनी सांगितले. एवढेच नाही तर दुचाकी विक्री करणाऱ्या मुख्य वितरकांनाही पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले. 

पोलिसांचे आवाहन

ज्या व्यक्तींच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत, त्यांनी पोलिस ठाणे वजिराबाद येथे येऊन संपर्क साधावा. दुचाकीची ओळख पटवून व कागदपत्रांची पुर्तता करून दुचाकी घेऊन जावे असे आवाहन केले. 
संदीप शिवले, पोलिस निरीक्षक वजिराबाद ठाणे, नांदेड. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police seize thirty bicycles, nanded news.