शर्टच्या बटनमुळे पोलिस पोचले मारेकऱ्यांपर्यंत! 

मनोज साखरे
बुधवार, 18 डिसेंबर 2019

बटनाचे शर्ट खरेदी करणाऱ्या दहा हजार जणांचा डेटा पोलिसांना मिळाला. डेटातील व्यक्तींबाबत माहिती गोळा करून काही निकष ठरविले. त्यावेळी 246 जणांवर विविध गुन्हे असल्याचे समोर आले. त्यांच्यावर मग पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. या सर्वांची नावे चौकशीसाठी तपास पथकांना वाटून दिली गेली. पथकाने अत्यंत खोलात जाऊन तपास केला. त्यात तीन ते चार संशयित पोलिसांना सापडले.

औरंगाबाद - जबरी चोरी करून वाईन शॉपचालकाचा खून झाला. झटापटीत मारेकऱ्याचे शर्टचे काळ्या रंगाचे बटन व चप्पल घटनास्थळी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुगलवरून बटनवरील नाव सर्च केले. या बटनाचे शर्ट ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला. त्यांच्याकडून खरेदीदारांची यादी घेतली अन्‌ तपास करून मारेकऱ्यांच्या मुसक्‍या आवळल्या. 

सिल्लोड शहरात 12 मे रोजी चार लाखांची लूट करून भिकन जाधव यांचा खून झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे एक शर्टचे बटन व चप्पल सापडली होती. बटनवर रोप लास्ट स्टीच हे नाव इंग्रजीत होते. ते नाव पोलिसांनी गुगलवर टाकून बघितले. त्यावेळी गुगलकडून अनेक संदर्भ मिळाले. त्यातून या नावाने बटन असलेले शर्ट फ्लिपकार्ट विक्री करीत असल्याचे पोलिसांना समजले. या बटनाने पोलिसांना फ्लिपकार्टपर्यंत नेले.

त्यांच्याकडून अशा बटनाचे शर्ट खरेदी करणाऱ्या दहा हजार जणांचा डेटा पोलिसांना मिळाला. डेटातील व्यक्तींबाबत माहिती गोळा करून काही निकष ठरविले. त्यावेळी 246 जणांवर विविध गुन्हे असल्याचे समोर आले. त्यांच्यावर मग पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. या सर्वांची नावे चौकशीसाठी तपास पथकांना वाटून दिली गेली. पथकाने अत्यंत खोलात जाऊन तपास केला. त्यात तीन ते चार संशयित पोलिसांना सापडले. त्यातील एकाने खुनाच्या चार दिवसांआधी फ्लिपकार्टवरून सुरा विकत घेतला होता, हेही पोलिसांना समजले.

हेही वाचा  :  ‘कल्याण’ बुकीवर आयजींचा छापा 

त्याच्यावरील संशय बळावल्यानंतर पोलिसांनी आणखी पुन्हा सीडीआर काढले. यानंतर त्याच्या दोन सहकाऱ्यांची पोलिसांनी माहिती गोळा करून तपास केला. त्यावेळी जालन्यातील परतूर, औरंगाबाद व सिल्लोडमधील ते असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानंतर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

हेही वाचा : video - इथे प्या एक रुपयात एक घोट चहा  

बदनापूरलाही 
केली होती लूट 

संशयितांवर यापूर्वीही गुन्हे आहेत. बदनापूर येथे एका वाईन शॉपचालकाला त्यांनी लुबाडले होते. ही बाब तपासातून व चौकशीतून समोर आली. त्यांनी अजून काही गुन्हे केल्याची शक्‍यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून 24 हजार रुपये, मोबाईलसह एक लाख 15 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले. 

असा केला होता प्लॅन 

चेतन गायकवाड हा सिल्लोडचा असल्याने त्याला वाईन शॉप व तेथील लोकांबाबत इत्थंभूत माहिती होती. त्याने अजय व संदीपला 12 मे रोजी सिल्लोड येथील शिक्षक कॉलनीतील घरी बोलावून घेतले. वाईन शॉप लुटण्याचा प्लॅन त्यांना समजावून सांगितला. वाईन शॉपमध्ये काम करणाऱ्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा सांगून लुटीच्या ठिकाणी जात लूट करून खूनही केला, अशी कबुलीच त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. 
क्‍लिक करा : ऑनलाईन नोकरीच्या अमिषाने गंडा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police solved murder case in Aurangabad