अन्नधान्य किट वाटपप्रकरणी राजकारण तापले, कुठे ते वाचा...

संजय कापसे
Saturday, 8 August 2020

आजाराच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना औंढा नागनाथ देवस्थानकडून वाटप करण्यासाठी आलेल्या अन्नधान्याच्या किट प्रकरणात पालिका पदाधिकारी व सदस्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पालिकेचे राजकारण तापले आहे. 

कळमनुरी : आजाराच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना औंढा नागनाथ देवस्थानकडून वाटप करण्यासाठी आलेल्या अन्नधान्याच्या किट प्रकरणात पालिका पदाधिकारी व सदस्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पालिकेचे राजकारण तापले आहे. अन्नधान्याचे किट प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोप  होत असताना एकमेकांची उणीदुणी काढली जात आहे.

कोरोना आजाराच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना मदत व्हावी, या उद्देशाने आमदार संतोष बांगर यांनी औंढा नागनाथ देवस्थानकडून कळमनुरी नगरपालिकेकडे २० एप्रिलला अन्नधान्याच्या पाचशे किट उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कळमनुरी नगरपालिकेकडे उपलब्ध झालेल्या या अन्नधान्याच्या किट नगराध्यक्ष व ११ नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील गरजू नागरिकांना वाटप केल्या होत्या. मात्र त्यानंतर राजकीय द्वेषामधून अन्नधान्य किट वाटप प्रकरणात नंदकिशोर तोष्णीवाल यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.

हेही वाचा - कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेबाबत अभियान, कुठे ते वाचा...
 
सदस्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अहवाल
या तक्रारीवरून उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याकडून  विनाविलंब चौकशी करण्यात आली. या चौकशीमधून श्री.खेडेकर यांनी पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई  करण्याचा अहवाल जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. या प्रकरणात  पालिकेचे मुख्याधिकारी उमेश कोठीकर,  कक्ष अधिकारी  मोहम्मद जाकिर,  मनोज नकवाल यांच्यावरही चौकशीमध्ये ठपका ठेवण्यात आला होता. मुख्याधिकारी व पालिका कर्मचाऱ्यांवर  कारवाई करण्याचे  संकेत अहवालामध्ये देण्यात आले होते.

हेही वाचा - सोयाबीन, मुग, उडीदच देईल शेतकऱ्यांना संजीवनी

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा
जिल्हाभरात पालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाने प्रस्तावित केलेली कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून हे प्रकरण चर्चेत होते. मात्र त्यानंतरही पालिका पदाधिकारी व सदस्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे श्री. तोष्णीवाल यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून  देण्यात आलेल्या चौकशी अहवालाचा धागा पकडून या प्रकरणात पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा  म्हणून  हे प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. त्यानुसार आता मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांनी या प्रकरणात गुरुवारी (ता.सहा) औंढा देवस्थानकडून मिळालेल्या अन्नधान्याच्या पाचशे कीट कुठलेही आदेश नसताना पालिका कर्मचाऱ्यावर दबाव टाकून जमावबंदी असताना परस्पर घेऊन गेल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिस ठाण्यात नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, नगरसेवक रत्नमाला नामदेव कराळे, अप्पाराव शिंदे, मीरा डुरे, सुमनबाई बेद्रे, राजू संगेकर, शकुंतला बुर्से, पार्वतीबाई पारवे, संतोष सारडा, सविता सोनुने, श्रीमती शेख सईदा मुसा यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशी केल्यास सत्य समोर येईल
औंढा देवस्थानकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्याच्या किट शहरातील गरजू नागरिकांना वाटप करण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांनाही सत्य काय आहे याची कल्पना आहे. त्यामुळे याप्रकरणी त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी केल्यास सत्य काय आहे ते समोर येईल. - उतमराव शिंदे (नगराध्यक्ष) 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics heats up over food kits distribution, read where ..., Hingoli News