esakal | खासदार संजय जाधव यांच्या दबावाचे राजकारण भाजपला पोषक ः आमदार बाबाजानी दुर्राणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बाजार समितीच्या प्रशासक नियुक्तीवरून खासदार संजय जाधव यांनी राजीनामा देवून दबावाचे राजकारण सुरु करून भाजपला पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे.

खासदार संजय जाधव यांच्या दबावाचे राजकारण भाजपला पोषक ः आमदार बाबाजानी दुर्राणी

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिल्हा परिषेदत आमचे पुर्ण बहुमत असतांनाही केवळ महाविकास आघाडीचा धर्म पाळत आम्ही शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या सत्तेत वाटा दिला. परंतू आता बाजार समितीच्या प्रशासक नियुक्तीवरून खासदार संजय जाधव यांनी राजीनामा देवून दबावाचे राजकारण सुरु करून भाजपला पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे.

जितूंर बाजार समितीवर अशासकीय प्रशासक नियुक्तीवरून नाराजी व्यक्त करत खासदार संजय जाधव यांनी राजीनामा पाठविला आहे. हे पूर्णत: चुकीचे आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन असतांना जिल्ह्यातही आम्ही सर्व मिळून मिसळून राहतो. जिल्ह्यात कुठेही वाद नाही. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसचे पुर्ण बहुमत आहे. परंतू अश्याही परिस्थितीत केवळ महाविकास आघाडीचा धर्म पाळत आम्ही शिवसेनेच्या सदस्यांना सभापती विराजमान करून सत्तेत वाटा दिला. जिंतूर बाजार समिती राष्ट्रवादी कॉग्रेसकडे तर बोरी बाजार समिती हि शिवसेनेकडे देण्याचे सर्वसहमतीने ठरले आहे.

खासदारांचे हे राजीनामा नाट्य केवळ या मतदार संघात भाजपला पोषक

असे असतांनाही खासदार संजय जाधव यांचा हा पवित्रा म्हणजे दबावाचे राजकारण असल्याचा आरोप आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. खासदार संजय जाधव यांनी या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष घालण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी लक्ष केंद्रीत करावे असा सल्लाही त्यांनी दिला. जिंतूर विधानसभा मतदार संघात भाजपच्या आमदार आहेत. त्यामुळे खासदारांचे हे राजीनामा नाट्य केवळ या मतदार संघात भाजपला पोषक वातावरण निर्माण करण्याचा डाव असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची देखील सहमती आहे

जिंतूर बाजार समिती राष्ट्रवादी कॉग्रेसकडे तर बोरी (ता.जिंतूर) बाजार समिती शिवसेनेकडे देण्याचा प्रस्ताव आम्ही सर्वांनी मिळून ठरविला होता. त्या संदर्भात  मी स्वता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोललो. त्यांना याची सर्व माहिती दिली. अजित दादांनी देखील ही माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली होती. त्या दोघांची देखील या प्रस्तावाला सहमती होती. परंतू असे असतांनाही खासदार संजय जाधव यांची ही मागणी चुकीची आहे. आम्ही मनाचा मोठेपणा करून जिल्हा परिषदेत शिवसेनेला सत्तेत स्थान दिले. असे असतांनाही केवळ दबावाचे राजकारण खेळण्याचा प्रयत्न खासदार संजय जाधव यांच्याकडून होत आहे. सरकारचा हा निर्णय आहे, त्याला विरोध करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया जिंतूरचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी दिली.

संपादन - प्रल्हाद कांबळे