फ्री हवीय का दोन किलो साखर किंवा अर्धा किलो चिकन... जिओमध्ये नंबर पोर्ट करा

फ्री हवीय का दोन किलो साखर किंवा अर्धा किलो चिकन... जिओमध्ये नंबर पोर्ट करा

आष्टी (बीड) : सध्या मोबाईल कंपन्यांमध्ये सुरू असलेलं पोर्टेबिलिटी वॉर आपल्याला माहीत आहेच. आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहक खेचण्यासाठी या मोबाईल कंपन्या काही ना काही ऑफर्स देतच असतात. पण बीड जिल्ह्यातील कडा आष्टी येथील मोबाईल दुकानदाराने काहीशी भन्नाट शक्कल लढवली आहे.

आपल्याकडील कोणतेही मोबाईल सिमकार्ड जिओमध्ये पोर्ट करणाऱ्या ग्राहकाला दोन किलो साखर किंवा अर्धा किलो चिकन फ्री दिले जात आहे. त्यामुळे दुकानदाराकडे चांगलीच गर्दी वाढू लागली आहे. आतापर्यंत अनेकांनी या ऑफरचा लाभ घेतला आहे.

आष्टी शहरातील बीड-आष्टी मार्गावरील रेणुकाई मोबाईल शॉपवर ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. या दुकानाचे मालक समीर पोकळे हे कायमच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही अनोख्या सवलती आणि ऑफर्स जाहीर करत असतात. पण यावेळी त्यांच्या या स्कीमने फक्त आष्टी गावातच नव्हे, तर जिल्हाभर चर्चेचा धुरळा उठवला आहे.

कोणत्याही नेटवर्कचा मोबाईल क्रमांक जिओमध्ये पोर्ट केला, तर ग्राहकाला साखर किंवा चिकन प्राधान्यक्रमानुसार दिले जात आहे.

याबद्दल बोलताना दुकानमालक समीर पोकळे म्हणाले, की आम्ही ग्राहकांना खेचण्यासाठी कायमच अशा काही ना काही भन्नाट ऑफर्स देत असतो. आताही आम्ही अगोदर चिकन फ्री देण्याचे ठरवले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण शाकाहारी ग्राहक मात्र साखर घेण्यासाठी गर्दी करत आहेत. सध्या आम्ही दिवसाकाठी किमान १० किलो चिकन तरी फ्री देतो, असेही त्यांनी सांगितले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com