सैन्यदलातील लिपीक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मंगेश शेवाळकर
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील शिवारातील तरुणीच्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सैन्यदलातील लिपिकास दिल्ली येथून शनिवार ( ता.९ ) चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील शिवारातील तरुणीच्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सैन्यदलातील लिपिकास दिल्ली येथून शनिवार ( ता.९ ) चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सेनगाव तालुक्यातील हाता शिवारामध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणी येथील शारदा मांगीलाल बेलसरे (वय २५ ) या तरुणीचा मृतदेह मागील आठवड्यात आढळून आला होता. उत्तरीय तपासणीमध्ये तिचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सेनगांव पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार, सेनगाव चे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, बाबुराव जाधव यांच्या पथकाने अधिक तपास सुरू केला होता. या तपासामध्ये मयत शारदा बेलसरे यांचा खून करून त्यांचा मृतदेह हत्ता शिवारात आणून टाकल्याचे प्राथमिक चौकशी स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सायबर सेलची मदत घेऊन खुनाला वाचा फोडली.

पोलिसांनी वाशिम जिल्ह्यातील तामसी येथील रामदास इडोळे या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी सैन्यदलात कार्यरत असलेल्या तामसी येथील नितीन बोबडे या जवानाचा शोध सुरू केला. यामध्ये नितीन बोबडे हा मुख्य आरोपी असल्याचे प्राथमिक चौकशी स्पष्ट झाल्यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक शुक्रवारी ( ता.८)पंजाब येथे रवाना झाले. नितीन बोबडे हा जबलपूर येथील सैन्य दलाच्या मुख्यालयात मागील सात वर्षांपासून लिपीक म्हणून काम करतो. पोलिसांनी तेथे चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र तो प्रशिक्षणासाठी हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यावरून पोलिसांच्या पथकाने तातडीने दिल्ली गाठून हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ची तपासणी केली. यामध्ये नितीन बसलेला दिसून आला. पोलिसांनी त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याला आज रात्री उशिरापर्यंत हिंगोली येथे आणले जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. नितीन बोबडे हा मागील सात वर्षापासून सैन्यदलात लिपिक म्हणून काम करत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the possession of the military clerical crime branch