Latur : विभागीय पदांवर पहिल्यांदाच महिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

departmental post

Latur : विभागीय पदांवर पहिल्यांदाच महिला

लातूर : महसूल विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या लातूरमध्ये विविध विभागाची मोठ्या संख्येने विभागीय कार्यालये आहेत. अनेक वर्षापासून कार्यालयाचा कारभार सुरू असून यात कार्यालय स्थापन झाल्याच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. यात सहकार विभागाच्या विभागीय सहनिबंधकपदी डॉ. ज्योती लाटकर - मेटे यांची, आरोग्य उपसंचालकपदी डॉ. कमल चामले तर माहिती उपसंचालकपदी डॉ. सुरेखा मुळे या नुकत्याच रूजू झाल्या आहेत.

सध्या देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात राज्यभर सुरू आहे. यात नवदुर्गांचा सन्मान केला जात आहे. प्रशासनातही महिलांनी दमदार कामगिरी केली आहे. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने प्रशासकीय सेवेतील या महिलांची दमदार प्रशासकीय कारकीर्दीचा हा थोडक्यात आढावा.

डॉ. ज्योती लाटकर

डॉ. लाटकर - मेटे या मुळच्या नांदेड येथील रहिवासी आहेत. अंबाजोगाई (जि. बीड) येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम. बी. बी. एस. पूर्ण केल्यानंतर त्या जळगाव जिल्हा रूग्णालयात आंतरवासिता करत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेची तयारी केली. अवांत्तर वाचनाची आवड असल्याने स्पर्धा परीक्षेकडे वळल्या. याच काळात भाऊ संजय हे आयआयटी पवई येथे शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. यामुळे दुसऱ्या प्रयत्नात १९९२ मध्ये उपनिबंधक (सहकारी संस्था) वर्ग एक पदावर निवड झाली. नांदेडला पहिल्यांदा रूजू काम केल्यानंतर मुंबई व परिसरात काम केले. रायगडला नागरी पतसंस्थांतील अडकलेल्या ठेवी परत करण्यासाठी चौकटीच्या बाहेर जाऊन काम केले.

सहनिबंधकपदी पदोन्नतीने मंत्रालयात, त्यानंतर कोकण व नाशिक विभागात काम केले. गेल्या महिन्यात येथे रूजू झाल्या आहेत. डॉ. लाटकर या `शिवसंग्राम`चे संस्थापक दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी असून लातूरचे तत्कालीन पोलीस अधिक्षक तथा झारखंडचे अतिरिक्त पोलिस संचालक संजय लाटकर यांच्या भगिनी आहेत. सहकार चळवळ वाईट नाही. ती चांगली ठेवण्याची जबाबदारी सर्व घटकाची आहे. महिलांनी प्रशासनात हिरिरीने पुढे यायला हवे. महिलांतील संवेदनशीलता गुणाची तुलना होऊ शकत नाही. निकोप समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी महिलांनी जास्तीत जास्त संख्येने प्रशासनात यायला हवे, असा त्यांचा आग्रह आहे.

डॉ. सुरेखा मुळे

डॉ. मुळे या मुळच्या बीड येथील असून त्यांचे एम. कॉम.पर्यंतचे शिक्षण तिथेच झाले आहे. शालेय जीवनापासूनच लेखनाची आवड आहे. पत्रकारिता अभ्यासक्रमाची पदवी व पदव्युत्तर पदवी औरंगाबाद विद्यापीठातून घेतल्यानंतर त्यांची मंत्रालय उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून सहायक संचालक वर्ग एकपदी निवड झाली. पत्रकारितेत पीएच. डी. मिळवली आहे. मंत्रालयात जाहिरात शाखेच्या प्रमुख म्हणून करताना राज्याचे जाहिरात धोरण निश्चित करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. अठरा वर्षाच्या कालावधीत मुंबईत ५० ते ६० मंत्र्यांकडे विभागीय संपर्क अधिकारी म्हणून काम केले. याच काळात त्यांना पदोन्नती मिळाली. राज्याच्या अर्थमंत्र्यांकडे सर्वाधिक काळ त्या संपर्क अधिकारी राहिल्या. यामुळे अनेक वर्षातील अर्थसंकल्प, व्हॅट व जीएसटी करप्रणालीच्या त्या साक्षीदार आहेत.

दोन वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्क अधिकारी म्हणून काम केल्यानंतर नुकत्याच त्या येथे रूजू झाल्या. अनेक वृत्तपत्रात त्यांचे विविध विषयावरील लेख प्रसिद्ध झाले आहेत. प्रत्येक क्षेत्राला स्वतःची आव्हाने आहेत. माहितीचे हे आव्हानात्मक क्षेत्र असून सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन धावपळ व परिश्रम करण्याची तयारी असल्यास या क्षेत्रातून अनेक लोकांचे प्रश्न सोडवता येतात. समाजाचे ऋण फेडण्याची मोठी संधी असल्याने महिलांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात महिलांनी मोठ्या संख्येने पुढे येण्याची आवश्यकता डॉ. मुळे यांनी व्यक्त केली.

डॉ. ज्योती चामले

डॉ. चामले यांचे मुळ गाव उदगीर असून बारावीपर्यंतचे शिक्षण तिथेच झाले. अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांचे एम. बी. बी. एस. व डी. ए.चे शिक्षण पूर्ण झाले. १९९४ मध्ये अहमदनगर, लातूर व उस्मानाबाद येथे काम केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भुलतज्ज्ञ वर्ग एकपदी निवड झाली. जालना येथे काम केल्यानंतर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०११ पर्यंत पाच वर्ष, तेथून स्त्री रूग्णालय व उदगीरला सामान्य रूग्णालयात काम केले.

दोन महिन्यापूर्वी पदोन्नतीने येथे आरोग्य उपसंचालकपदी नियुक्ती झाली. पूर्वीपासूनच प्रशासकीय सेवेची आवड आहे. प्रशासनाच्या माध्यमातून समाजाची सेवा करत कुटुंबांकडेही लक्ष देता येते. महिलांना अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. सर्व भूमिकांना योग्य न्याय देण्यासाठी महिलांनी प्रशासनात येण्याची गरज डॉ. चामले यांनी स्पष्ट केली.

टॅग्स :Laturdoctorwomenpost