चक्क डांबरी रस्‍त्यावरील खड्डे मुरमाने बुजाविले, उस्मानाबादकरांची फसवणूक

सयाजी शेळके
Tuesday, 15 September 2020

बड्या राजकीय नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध असल्याने कंत्राटदार खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करीत असून शहरातून जाणाऱ्या प्रमुख महामार्गावरील डांबरी खड्डे मुरमाने भरण्याचा पराक्रम बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराने केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उस्मानाबाद : बड्या राजकीय नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध असल्याने कंत्राटदार खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करीत असून शहरातून जाणाऱ्या प्रमुख महामार्गावरील डांबरी खड्डे मुरमाने भरण्याचा पराक्रम बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराने केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या बड्या कंत्राटदाराला अभय कोणाचे? असा प्रश्न सामान्य वर्गातून विचारला जात आहे. विशेष म्हणजे बांधकाम विभागाने पत्र देऊनही शहरातील खड्डे भरले नसल्याची हतबलता अधिकारी बोलून दाखवित आहेत.

शहरातील तेरणा महाविद्यालयापासून शहर बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आयुर्वेदिक महाविद्यालयापर्यंतचा रस्ता गेली अनेक वर्षे दुरुस्त झालेला नाही. त्यामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून खडी उघडी पडली आहे. त्यातच डांबरीकरणाचे लहान कण हवेत उडून रस्त्यावर धुरूळा उडत आहे. शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा सत्र न्यायालय, शहर बसस्थानक अशा मोठ्या संस्था आहेत.

अँटिजेन चाचणीत निगेटिव्ह, स्वॅब घेताच कोरोना पॉझिटिव्ह, हा काय आहे प्रकार?

त्यामुळे नेहमीच या रस्त्यावर वर्दळ असते. परिणामी रस्त्यावर धुळीचे लोट दिसून येतात. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने बुजविणे गरजेचे आहे. दरम्यान पावसाळ्यात डांबरीकरण होत नसल्याचे काही अधिकारी सांगतात. मग, कळंब- ढोकी उस्मानाबाद या रस्त्यावर संपूर्ण पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम कसे सुरू आहे? असा प्रश्न विचारताच अधिकारीही गोंधळून जात आहेत.

मुजोरीपणाचा कळस
शहरातील तेरणा महाविद्यालयापासून शहर बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आयुर्वेदिक महाविद्यालयापासून बेंबळीपर्यंतचा रस्ता दुरुस्तीसाठी एका बड्या ठेकेदाराला देण्यात आला आहे. या कंत्राटदाराने रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने बुजविण्याच्याऐवजी मुरुम टाकून बुजविण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे रस्त्यावरील धुळ कमी होण्याच्याऐवजी वाढली आहे.

‘आरटीई’त गैरप्रकार उघड, खोट्या माहितीवर शाळेत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न

वास्तविक डांबरीकरणाचे खड्डे कधीच मुरुम टाकून बुजवत नाहीत. तरीही या बड्या ठेकेदाराने असा पराक्रम केला आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे खड्डे बुजविण्याच्या संदर्भात पत्र दिले आहे. तरीही हा ठेकेदार ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे अधिकारी बोलून दाखवित आहेत. मोठ्या राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याने हा कंत्राटदार असा खेळ करीत असल्याची चर्चा बांधकाम विभागाच्या वर्तुळात सुरू आहे. या ठेकेदाराला नेमके अभय कोणाचे आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला पत्र दिले आहे. मात्र त्याचा डांबरीकरणाचा प्लँट सुरू नसल्याने त्याने खड्डे बुजविले नाहीत. अशी कारणे सांगणे योग्य नाही. खड्डे डांबरीकरणानेच बुजविले पाहिजेत.
- व्ही. एन. गपाट, उपकार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, उस्मानाबाद.

 

 

संपादन - गणेश पिटेकर
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Potholes Not Repair Well In Osmanabad