मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या वेळी सुरु झालेली प्रभातफेरी, आजही लातूर जिल्ह्यात सुरु

3marathawada
3marathawada

चाकूर (जि.लातूर) : भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीने मराठवाडा मुक्तिसंग्राम लढला गेला. यादरम्यान सुरू करण्यात आलेली प्रबोधनात्मक प्रभातफेरीची परंपरा आजही अविरतपणे चालवली जात आहे. यानिमित्त चाकूर येथील श्रीनिवासराव निलंगेकर यांनी मराठवाडा मुक्तिलढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद संस्थानचा भाग होता.

हे संस्थान स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यात आली होती. रझाकार संघटनेच्या माध्यमातून जनतेवर अत्याचार सुरू होते. याचदरम्यान आर्य समाजाच्या माध्यमातून चळवळ सक्रिय करण्यात आली. १९४६ मध्ये चाकूर गावात संगय्या स्वामी, विश्वनाथराव पाटील, नागनाथ शेटे, होनय्या स्वामी यांनी प्रबोधनात्मक प्रभातफेरीला सुरवात केली.

विजयादशमीच्या दुसऱ्या दिवसापासून महिनाभर ही फेरी काढून आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीव करून देऊन देशभक्ती जागृत केली जात होती. हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तिपर गाणं गायले जात होते. प्रत्येक घरातील व्यक्ती यात सहभागी होत होते. गावातील मारुती मंदिरापासून ही प्रभात फेरी काढली जायची. याचा वंदे मातरम या गीताने पाटील यांच्या वाड्याखाली शेवटं व्हायचा.

यात गावातील स्वातंत्र्यसैनिक नारायणराव जोशी, कमलबाई जोशी, लक्ष्मण पेंटर, त्र्यंबकप्पा मोतीपवळे, दासराव जोशी, रानबा महालिंगे, तुळशीराम कांबळे, एम. आर. पाटील, बळीराम सोनटक्के यांचा पुढाकार होता. रझाकाराच्या अत्याचारातून मुक्त होण्यासाठी संघर्ष सुरू होता. वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले जात होते. यात सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी ‘राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा’...हे गीत संगय्या स्वामी पहाडी आवाजात गात होते. यामुळे सर्वजण मोठ्या उत्साहाने प्रभातफेरीत सहभागी होत असत. पहाटे चार वाजता महिला घराच्या समोर सडा टाकून रांगोळ काढत होत्या.

या चळवळीत गिरधारीलाल नावंदर, काशीनाथ शेटे, जिंदास बुरसे, एकनाथ वाघ, एकनाथ कुलकर्णी, निवृत्ती रेड्डी, परसराम सूर्यवंशी, मारोती बावलगावे, सांब शास्त्री, चन्नाप्पा शेटे, रामय्या व्होट्टे, आंबादास शास्त्री, देवराव जाधव, बाबूराव वकील, गुंडाप्पा नाकाडे, तम्पू पाटील यांनी महत्त्वाचे कार्य केले. मुक्तिसंग्रामाच्या लढ्यानंतरही प्रभातफेरी काढण्याची परंपरा सुरू आहे. श्रीनिवास निलंगेकर, तम्मू पाटील, विजयकुमार जोशी, मुरलीधर चाकूरकर, सर्वोत्तमराव कुलकर्णी, आर. डी. कुलकर्णी हे यात सहभागी होत असत.


रझाकाराच्या अत्याचाराचा राग येत होता. यामुळे देशप्रेमासाठी प्रत्येकजण या प्रभातफेरीत सहभागी होत होते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी सध्या मी पूर्वीपासून सुरू असलेल्या रस्त्यावरून फेरी काढत आहे.
- श्रीनिवास निलंगेकर
 

 

संपादन - गणेश पिटेकर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com