
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाच दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पाऊस कमी- अधिक प्रमाणात सुरू आहे. रविवारी परभणी, हिंगोली जिल्ह्याचा अपवाद वगळता बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम आणि हलका पाऊस झाला. शेतशिवारांत पाणीच-पाणी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहरासह इतर तालुक्यांत दुपारी दीड तास मुसळधार पाऊस झाला. वीज पडून जालना जिल्ह्यात दोन जण तर लातूर जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. जोरदार वादळात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.