ऑनलाइन देयके भरण्याला ‘या’ तालुक्याची पसंती  

संजय कापसे
Monday, 13 April 2020

ऑनलाइन वीज देयकाची व्यवस्‍था सर्वत्र महावितरणने केली आहे. याचा लाभ कळमनुरी शहरासह तालुक्यातील बाराशे वीज ग्राहकांनी घेतला आहे.  

कळमनुरी ः ‘कोरोना’मुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर ठप्प झालेली यंत्रणा पाहता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजग्राहकांना महावितरण ॲप उपलब्ध करून दिले आहे. यामार्फत ग्राहकांनी वापरलेल्या वीज मीटरची रिडिंग सबमिट करण्याची व्यवस्था असून ऑनलाइन देयक व काही तक्रारी व सूचनाही या ॲपमार्फत नोंदविल्या जाणार आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर जवळपास बाराशे वीज ग्राहकांनी ऑनलाइन देयके भरणा केली आहेत.

‘कोरोना’मुळे करण्यात आलेले लॉकडाऊन व सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधून होणारी गर्दी टाळण्याकरिता शासनाने बनवलेल्या नियमावलीत शासकीय कार्यालयांमधून पाच टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयाची बाजू पाहता वीज वितरण कंपनीकडून येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेत वीज ग्राहकांसाठी महावितरण ॲप उपलब्ध करून देत संभाव्य अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा - लॉकडाउन : महावितरणचे सरासरीनुसार वीजबिल

या सुविधा मिळणार  
तालुक्यातील घरगुती, औद्योगिक, व्यवसायिक वीज वापर करणाऱ्या ग्राहकांची या बंद दरम्यान प्रत्यक्ष जागेवर जात मीटर रिडिंग घेता येणार नाही, हे लक्षात घेता वीज वितरण कंपनीने या महिन्याच्या सुरवातीलाच वीजग्राहकांना महावितरण ॲप उपलब्ध करून दिले आहे. या ॲपच्या माध्यमातून वीज ग्राहकाला स्वतः आपल्या वापरलेल्या विजेची मीटर रीडिंग सबमिट करता येणार आहे. याशिवाय वीजग्राहकांच्या काही तक्रारी व सूचना असल्यास त्याही त्यांना या ॲपद्वारे मांडता येणार आहेत.
वीजग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या महावितरण ॲप माध्यमांमधून ग्राहकाला त्यांनी वापरलेल्या विजेच्या वीज देयकाचा भरणाही या ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन करता येणार आहे. 

हेही वाचा - परभणीत तापमानाने गाठली चाळीशी

२१ लाख ८७ हजारांचा केला भरणा 
वितरण कंपनीने एप्रिल महिन्यात वीजग्राहकांची मीटर रीडिंग घेतली जाणार नाही, त्याकरिता वीज ग्राहकांनी महावितरण ॲपचा वापर करावा यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न चालवले आहेत. त्या दृष्टीने यासंदर्भात माहिती देण्यासाठी तालुक्यातील २८ हजार सहाशे वीज ग्राहकांना एसएमएस केले असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील जवळपास बाराशे वीज ग्राहकांनी २१ लाख ८७ हजार तीनशे रुपयांची वीज देयके ऑनलाइन भरली आहेत.

 

रीडिंग सबमिट न केल्यास सरासरी देयक 
महावितरण कंपनीकडून ग्राहकांना महावितरण ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा जे ग्राहक एप्रिल महिन्याची मीटर रीडिंग या ॲपद्वारे सबमिट करणार नाहीत. त्या ग्राहकांना सरासरीप्रमाणे वीज देयके दिली जाणार आहेत. वीज ग्राहकांनी या अडचणीच्या काळात कंपनीला सहकार्य करावे. - एस. एस. रेकुळवाड, उपविभागीय अभियंता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preference for 'this' taluka for paying online payments, hingoli news