परभणीत लसीकरणासाठी ॲक्शन प्लॅन तयार, शीतसाखळी कार्यान्वित

PNE
PNE

परभणी ः कोरोनाने घातलेल्या थैमानानंतर आता कुठे लसीकरणासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झाल्या आहेत. लसीकरणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात सात हजार ४५८ आरोग्य सेवकांचे लसीकरण केले जाणार आहे. जानेवारी महिण्याच्या पहिल्या आठवड्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

केंद्र, राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात आली असून बैठका सुध्दा झालेल्या आहेत. 

लसीकरणाचा पहिला टप्पा आरोग्य कर्मचाऱ्यांचा 
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील सात हजार ४५८ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने माहिती संकलीत केली आहे. 

५२३ संस्थांतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार 
जिल्ह्यातील शासकीय व खासगी ५२३ आरोग्य संस्थांमधील सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये ६२ संस्था शासकीय तर ४६१ संस्था खासगी आहेत. या संस्थांमधील ८३६ वैद्यकीय अधिकारी, ५७८ परिचारिका व पर्यवेक्षक, फिल्डवर काम करणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी ताई, मदतनीस यांची संख्या चार हजार ४४९ आहे. पॅरा मेडीकल स्टॉफ ३१९ चा, सहाय्य करणारे ४९७, कार्यालयीन कर्मचारी ३६६, संशोधन करणारे विद्यार्थी पाच तर वैद्यकीय महाविद्यालयील ६३ अशा एकूण सात हजार ४५८ आरोग्य सेवकांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर देशमुख, डॉ. गणेश सरसुलवार, डॉ. किशोर सुरवसे यांनी दिली. 

वॅक्सिन साठवण्यासाठी शीतसाखळी तयार 
जिल्हा आरोग्य विभागाने शित साखळी तयार ठेवली आहे. जिल्ह्यात त्यासाठी ४३ कोल्ड चैन पॉईंट (सीसीपी) तयार करण्यात आलेले असून लस साठवण्यासाठी ४९ आईस लॅन्ड रेफ्रीजेटर राहणार आहे. ज्यांची क्षमता नऊ हजार ५१ लिटर लस साठवण्याची आहे. डिप फ्रीजरची संख्या ४९ असून क्षमता सात हजार १९७ लिटर्स आहे. पाच लिटरचे १५ कोल्ड बॉक्स, २० लिटरचे ५३ कोल्ड बॉक्स असून शेवटच्या टप्प्यापर्यंत वॅक्सीन वाहून नेण्यासाठी एक हजार ४०१ वॅक्सीन करिअर देखील तयार ठेवण्यात आलेल्याची माहिती डॉ. सरसुलवार यांनी दिली. 

जिल्ह्यात सर्वत्र लसीकरणाची तयारी पूर्ण 
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वत्र लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू असून त्यानंतर अन्य संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. जनजागृतीची मोहीम देखील हाती घेतली जाणार आहे. - डॉ. शंकरराव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, परभणी. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com