कुठे जोरदार, तर कुठे हलका... पण आला

कैलास चव्हाण
Sunday, 28 June 2020

परभणी जिल्ह्यात शनिवारच्या (ता. २७) मध्यरात्री मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सहा मंडळे कोरडी राहिली, तर उर्वरित ३२ मंडळांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. जिंतूर आणि पालम तालुक्यात दमदार पावसाने झोडपून काढले. दरम्यान, चुडावा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

परभणी : परभणी जिल्ह्यात शनिवारच्या (ता. २७) मध्यरात्री मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सहा मंडळे कोरडी राहिली, तर उर्वरित ३२ मंडळांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. जिंतूर आणि पालम तालुक्यात दमदार पावसाने झोडपून काढले. चुडावा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दरम्यान, रविवारी (ता. २९) पुन्हा दुपारी दोनच्या सुमारास वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. हा पाऊस परभणी शहर आणि परिसरात सुरू होता. अन्य ठिकाणी ढग दाटून आले होते.

परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे खरिपातील पेरणी केलेली पिके धोक्यात आली असताना शनिवारी जिल्ह्याच्या काही मंडळांत पावसाने दमदार हजेरी लावली, तर काही मंडळाना पुन्हा पावसाने धोका दिला आहे. जिंतूर, सेलू, पालम आणि पूर्णा, गंगाखेड तालुक्यातील काही मंडळांत जोरदार पाऊस झाला. मागील चार दिवसांपासून उकाडा प्रचंड वाढला असून दररोज आभाळ भरून येत आहे. परंतु, पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. बहुतांष मंडळात मागील १५ दिवसांपासून पाऊस नसल्याने कोवळी पिके धोक्यात आली आहेत, तर काही मंडळांत चार दिवसांपासून हलक्या पावसाची हजेरी लागत आहे.

हेही वाचा : आरोग्य सभापतीकडून कोरोना वॉरिअर्सचा सन्मान - कुठे ते वाचा

उर्वरित भागात प्रतीक्षा कायम

ज्या भागात पेरण्या रखडल्या आहेत. तेथे अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून पेरण्या लाबंत चालल्या आहेत. पावसाअभावी सोयाबीन, कपाशी पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री काही भागात झालेल्या पावसाने आशा पल्लवित झाल्या आहेत. अद्यापही उर्वरित भागात पावसाची प्रतीक्षा कायम राहिली आहे.

मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटर)
परभणी शहर ०१, परभणी ग्रामीण ०३, दैठणा ०२, झरी १०, पेडगाव०२, जांब १२, पालम २५, चाटोरी ४०, बनवस ४५, पूर्णा ५६, ताडकळस ३९, चुडावा १००, लिमला ०४, गंगाखेड १८, राणीसावरगाव २१, माखणी १४, महातपुरी १५, सोनपेठ ०८, आवलगाव १०, कुपटा ३२, वालूर १८, पाथरी ०८, बाभळगाव ०५, हादगाव २६, जिंतूर २८, सावंगी म्हाळसा ४७, बोरी ३१, चारठाणा १८, आडगाव २४, बामणी २६, मानवत ०४, केकरजवळा २२, कोल्हा ०५, एकूण २८.५४ मिलिमीटर पाऊस मागील २४ तासांत झाला आहे.

हेही वाचा : धक्कादायक..! हॅलो दादा मी नदीमध्ये उडी मारतोय... -

 ही मंडळे राहिली कोरडी
सिंगणापूर, पिंगळी, कातनेश्वर, सेलू, देऊळगाव, चिकलठाणा या मंडळांत पाऊस झाला  नसल्याची नोंद आहे.

आतापर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस
तालुका    झालेला पाऊस     टक्केवारी  वार्षिक सरासरी

परभणी     १४५.६६          १५.०७       ९६५.५७
पालम      १६७.०३          २०.०१      ८३०.९०
पूर्णा       १७१.२०             १८.०५    ९२७.९०
गंगाखेड   १४२             १६.०४      ८६५.३०
सोनपेठ    १४८           १८.०६       ७९३.९०
सेलु      १६२              १९.०३        ८३७.५०
पाथरी   २१८.९८           २४.०६       ८९१.३३
जिंतूर    १६१.९८           १९         ८५२.९६
मानवत  १९२.०१      २२.०५       ८५२.१०
एकूण     १६७.६५       २०         ८३८.९०
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Presence of rains in Parbhani district Parbhani News