
हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून सेनगाव तालुक्यात झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब पडले. सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली. यामुळे जिल्ह्यातील बहूतांश गावात वीजपुरवठा खंडित झाला होता.
हिंगोली : जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून रविवारी रात्री व सोमवारी (ता.एक) पहाटेपर्यंत पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातील काही गावात वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली तसेच विजेचे खांब देखील पडले. यामुळे अनेक गावातील वीजपुरवठा रात्रभर बंद होता. तसेच जिल्हाभरात रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती.
जिल्ह्यात हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी व सेनगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावात रविवारी पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे रात्री उशिरा वादळी वाऱ्याने वीजपुरवठा करणारे विजेचे खांब मोडून पडल्यामुळे धनगरवाडीसह हाताळा, आजेगाव, पळशी, जवळा या गावातील वीजपुरवठा रात्रभर खंडीत होता. सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत हा पुरवठा बंदच होता. तसेच हाताळा परिसरात वादळी वाऱ्याने अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडली होती. या गावात अनेक घरावरील टिनपत्रे उडाल्याने ही पत्रे जमा करण्यासाठी गावकऱ्यांना धावपळ करावी लागली.
शेतकरी खते, बियाणे खरेदीच्या तयारीत
हिंगोली शहरासह जिल्ह्यात रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना आता यावर्षी वेळेवर पाऊस पडणार असल्याच्या आशा पल्लवीत झाल्या. अनेक शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत मग्न झाले आहेत. पेरणीपुर्व मशागतीची कामे बहुतांश शेतकऱ्यांची आटोपली असून आता शेतकरी खते, बियाणे खरेदीच्या तयारीत आहेत तर काही शेतकरी हे खरेदी करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करीत आहेत. रविवारी सायंकाळी व सोमवारी पहाटेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
हेही वाचा - नृत्यातून आनंदी जीवन जगण्याचा विद्यार्थ्यांचा संदेश... -
पावसाने वातावरणात झाला बदल
मागच्या काही दिवसांपासून तापमान ४३ अंशापर्यत गेले होते, यामुळे कमालीची उष्णता निर्माण झाली होती. जिल्ह्यात रविवारी झालेल्या या पावसाने वातावरणात बदल झाला असून तापमान ३४ अंशावर आल्याने वातावरणातील उष्णता कमी झाली. हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यावर्षी जिल्ह्यात तीन लाख ७८ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले असून यावर्षी दोन लाख ५५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - लॉकडाउनचा असाही फायदा : बालविवाहाचा धडाका -
शेतकरी मशागतीच्या कामात मग्न
जिल्ह्यात रविवारी झालेल्या पाऊस सर्वदुर झाल्याने शेतकरी झपाट्याने मशागतीच्या कामात मग्न झाले असून सोमवारी सकाळीच अनेकांनी शेतात जावून शेतात उर्वरित राहिलेले कामे सुरू केली आहेत. यात शेतातील आखाडा तयार करणे, काडी कचरा वेचून त्याची विल्हेवाट लावने अशी कामे सुरू झाली आहेत. तर काही जणांनी ही सर्व कामे पुर्ण केल्याने ते आता एका मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत असून मोठा पाऊस झाल्यावर पेरणीच्या कामांनादेखील सुरूवात करणार आहेत.
वीज कोसळून बैल दगावला
वसमत तालुक्यातील कवठा येथे रविवारी रात्री विजेच्या कडकडाटासह झालेल्या गाराच्या पावसात वीज कोसळून शेतकरी केशव खराटे यांचा बैल दगावला. ऐन पेरणीच्या वेळी ही घटना घडल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले.