
उषा तांबे यांची साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड
उदगीर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांची मुदत संपत असल्याने नवीन अध्यक्ष होणार याकडे साहित्यिकांचे लक्ष लागले होते . पण आज मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांची साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी उषा तांबे यांचा छोटेखानी सत्कारही करण्यात आला.
साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद रोटेशन पद्धतीने महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विदर्भ साहित्य संघ, मुंबई साहित्य संघ आणि मराठवाडा साहित्य परिषदेकडे असते. यंदा ते मराठवाडा साहित्य परिषदेकडे होते. त्या अंतर्गत कौतिकराव ठाले पाटील यांची निवड झाली होती. दर तीन वर्षांनी हे अध्यक्षपद संबंधित विभागांकडे दिले जाते. त्यानुसार यावेळी हे अध्यक्षपद मुंबई साहित्य संघाकडे आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षांसाठी मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
ठाले पाटील यांच्या अध्यक्षपदाची मुदत गेल्या महिन्यात संपत होती. परंतु उदगीर येथील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, कार्यवाह म्हणून उज्ज्वला मेहेंदळे तर कोषाध्यक्ष म्हणून प्रकाश पागे यांची निवड करण्यात आली आहे.
महामंडळाच्या आजच्या बैठकीत माझे नाव निश्चित झाले आहे. येत्या एक मेपासून अध्यक्षपदाचा कार्यभार अधिकृतरित्या स्वीकारणार आहे.
- उषा तांबे
Web Title: President Of Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal Usha Tambe Udgir
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..