esakal | रॉकीच्या मृत्यूने पंतप्रधानही भावुक, बीड पोलिस दलाचा मोदींनी केला ‘मन की बात’मध्ये उल्लेख
sakal

बोलून बातमी शोधा

Rocky Dog

म्हणतात ना चांगल्या कामाचे नाव मरणानंतरही निघते. माणूसच काय; पण अनेक प्राण्यांच्या कामगिरीची नोंद इतिहासात आहे. बीडच्या पोलिस दलातील रॉकी या श्वानानेही असे काम केले, की त्याच्या मृत्यूमुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा भावुक झाले.

रॉकीच्या मृत्यूने पंतप्रधानही भावुक, बीड पोलिस दलाचा मोदींनी केला ‘मन की बात’मध्ये उल्लेख

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : म्हणतात ना चांगल्या कामाचे नाव मरणानंतरही निघते. माणूसच काय; पण अनेक प्राण्यांच्या कामगिरीची नोंद इतिहासात आहे. बीडच्या पोलिस दलातील रॉकी या श्वानानेही असे काम केले, की त्याच्या मृत्यूमुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा भावुक झाले. यानिमित्त बीड पोलिस दलाची नोंद पंतप्रधानांच्या यादीत झाली.
रविवारच्या (ता.३०) ‘मन की बात’मध्ये पोलिस श्वान रॉकीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि बीड पोलिसांनी त्याला दिलेल्या अंतिम निरोपाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

२७ सेकंदांचा वेळ त्यांनी यासाठी देणे हा रॉकीच्या कामगिरीचा सन्मान आणि बीड पोलिसांसाठी अभिमानास्पद आहे. आपले काम निष्ठेने आणि प्रामाणिक केले तर त्याची नोंद घेतलीच जाते. मनुष्याबरोबरच अनेक प्राण्यांचीही इतिहासाने नोंद घेतली आहे. असेच नाव बीड पोलिस दलातील रॉकीने कमावले. अनेक पदकांचा मानकरी आणि खून, चोऱ्या, दरोडे अशा साडेतीनशेवर गंभीर गुन्ह्यांचा तपास त्याने केला; पण आजाराने निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला बड्या पोलिस अधिकाऱ्यांनी खांदा दिला आणि त्याला अखेरचा निरोप देताना भावुक झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या.

लातूरच्या रेल्वेबोगी कारखान्यात डिसेंबरपासून प्रत्यक्ष निर्मिती, रोजगार होणार...

बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना
नऊ वर्षांचे आयुष्य जगलेल्याला रॉकीला निरोप देताना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून पोलिस दलातर्फे मानवंदनाही देण्यात आली. त्याचे जाणे पोलिस दलासाठी जेवढे वेदनादायी तेवढे त्याच्यासाठी अभिमानाचे ठरले. त्याच्या अंत्यविधीला अख्खे पोलिस दलातील प्रमुख हजर होते. सजविलेल्या पोलिस जीपमधून रॉकीची अंत्ययात्रा निघाली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत, स्वप्नील राठोड आदी बड्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मृतदेहाला दोरीच्या साह्याने खांदा दिला. त्यानंतर त्याला बंदुकीतून फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

सहाव्या महिन्यात पोलिस दलात
१८ ऑक्टोबर २०११ ला जन्म झालेला रॉकी वयाच्या सहाव्या महिन्यात बीड पोलिस दलात दाखल झाला. नऊ महिने त्याने विविध प्रशिक्षणे घेतल्यानंतर त्याची गुन्हे तपासासाठी निवड झाली. नितीन येवले व सुरेंद्र दुबाले यांच्या सोबतीने त्याने २०१३ ते १५ या तीन वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील एआयपीडीएम स्पर्धांत महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिनिधित्व केले. २०१६ मध्ये म्हैसूर (कर्नाटक) येथील याच स्पर्धेत त्याने कांस्यपदक पटकावत पोलिस दलाची मान उंचावली. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतील ३६५ गुन्ह्यांचा तपास आणि शिरटोन (जि. उस्मानाबाद) येथील खुनाच्या तपासातही त्याच्यामुळे यश आले. कोरोना जनजागृतीबाबत पोलिस दलाने बनविलेल्या शॉर्ट फिल्ममध्येही रॉकीची भूमिका आहे. दरम्यान, ता. १७ जुलैपासून आजारी असलेल्या रॉकीचे शनिवारी पहाटे निधन झाले.

सोयाबीनवर करपा, तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव; उत्पादनात घट होण्याची भीती

(संपादन - गणेश पिटेकर)