उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळात, निर्मितीच्या कामाला आला वेग

तानाजी जाधवर
Wednesday, 26 August 2020

उस्मानाबाद जिल्हा निती आयोगाच्या यादीमध्ये असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधाची वानवा आहे. या भागामध्ये अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय उभे  रहावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासुन होत आहे.

उस्मानाबाद: जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी आवश्यक अटीची पुर्तता झाली असून आता परिपुर्ण प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सचिव सौरभ विजय यांना दिली आहे. उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय निर्मीतीबाबत सद्यस्थिती  जाणुन घेण्यासाठी व ते लवकर होण्यासाठी आवश्यक बाबीवर चर्चा व्हावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यांच्या आदेशानुसार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली. या बैठकीला आदित्य ठाकरे व संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

उस्मानाबाद जिल्हा निती आयोगाच्या यादीमध्ये असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधाची वानवा आहे. या भागामध्ये अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय उभे  रहावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासुन होत आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या अटी व निकषाची पुर्तता जिल्ह्यातून करण्यात आली आहे, त्यामुळे विनाविलंब याबाबतीत निर्णय झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केली होती. त्यानुसार तातडीने त्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी बैठक घेतली, या बैठकीमध्ये त्यानुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली असून शासन त्यासाठी सकारात्मक असल्याची भुमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यानी मांडली. जानेवारी महिन्यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालकांनी जिल्हाधिकारी यांना महाविद्यालयासाठी जमिनीच्या उपलब्धतेबाबत विचारणा केली होती. जिल्हाधिकारी यांनीही 25 एकर जमीन उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय विभागाला कळविली आहे.

याशिवाय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या इतरही आवश्यक अटीची पुर्तता देखील झाली असून कुठेही अडचण येऊ नये, असा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचेही श्री.देशमुख यांनी सांगितले. तो प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर ठेवावा लागणार असून हा प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मंत्री महोदयांनी सचिवांनी दिले. त्यामुळे लवकरच हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय सूरु होण्याच्या प्रक्रियेला या बैठकीनंतर निश्चितपणाने वेग येईल, असा विश्वास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला.
 
महाविद्यालयासाठी आदित्य ठाकरे आग्रही असल्याचे श्री. देशमुख यांनी यावेळी बैठकीत सूरुवातीलाच सांगितले. सातत्याने त्यांनी महाविद्यालयाच्या प्रक्रियेबाबत माहिती घेतल्याचे सांगितले. ही बैठक सुध्दा यांच्या विनंतीवरुनच घेतल्याचे अमित देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. कितीही अडचणी आल्या तरी हे महाविद्यालय आपण निश्चितपणे सूरु करु, असा विश्वास त्यांनी आदित्य ठाकरे यांना यावेळी दिला
                                                                                                           
संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A proposal for a medical college in Osmanabad district has been put in the cabinet and its work has started