
लग्न सोहळे, विविध सण समोर ठेवून अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी भाजीपाल्याची लागवड केली आहे. मात्र, लॉकडाउमुळे सर्वच लग्नाचे कार्यक्रम रद्द झाले असून विक्रीअभावी शेतातील भाजीपाला जागेवरच खराब होत आहे.
केंद्रा बुद्रुक (जि. हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथील अनेक शेतकरी दरवर्षी लग्नसराईत विक्रीसाठी येणाऱ्या भाजीपाल्याची लागवड करतात. या वर्षीदेखील शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. मात्र, लॉकडाउमुळे सर्वच लग्नाचे कार्यक्रम रद्द झाले असून विक्रीअभावी शेतातील भाजीपाला जागेवरच खराब होत आहे.
सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक व परिसरातील काहकर बुद्रुक, गोंधनखेडा, जामठी बुद्रुक, बटवाडी आदी गावांतील शेतकरी लग्नसराईत येणारे वांगे, टमाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची, पालक, आंबाडी आदी भाजीपाल्यांची लागवड करतात.
हेही वाचा - कळमनुरीत बाराशे कर्मचाऱ्यांना विमा कवच
भाजीपाला आला तोडणीस
मार्च, एप्रिल व मे असे तीन महिने दरवर्षी भाजीपाल्याला चांगली मागणी असते. यामुळे उन्हाळ्यात भाजीपाले उत्पादकांना चांगला आर्थिक आधार मिळतो. या वर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. काही दिवसांपासून भाजीपाला तोडणीस आला आहे. मात्र, या वर्षी तिथीप्रमाणे होणारे आतापर्यंतचे सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहेत.
विक्रीअभावी भाजीपाल्याचे नुकसान
सार्वजनिक कार्यक्रमदेखील बंद झाले असून आठवडे बाजार, शहरातील भाजीमंडई बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर आलेल्या भाजीपाल्याचे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. भाजीपाल्याचा कालावधी उलटून जात असल्याने विक्रीअभावी भाजीपाल्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
लग्न सोहळे रद्द
दीड एकरात वांगे, मिरची लावली आहे. ती तोडणीसदेखील आली आहे. मात्र, कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीने लग्न सोहळे रद्द झाल्याने त्याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे.
- ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, गोंधनखेडा
पोतरा येथे भाजपतर्फे भाजीपाल्याचे वाटप
पोतरा : कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावासह परिसरातील जांब, निमटोक, तेलंगवाडी, टव्हा, माळधावंडा येथे भाजपचे तालुकाध्यक्ष रुपेश कदम यांच्यातर्फे पाचशे गरजूंना रविवारी (ता. १२) भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले.
येथे क्लिक करा - हिंगोलीत स्वच्छता कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण
मदत करण्याचे पदाधिकाऱ्यांना आवाहन
कोरोना संकटामुळे ग्रामीण भागात भरणारे आठवडे बाजार बंद झाले आहेत. ग्रामीण भागात औषधी, भाजीपाला मिळणे कठीण झाले आहे. यासाठी माजी आमदार गजानन घुगे यांनी अन्नधान्यासह इतर वस्तूंचे वाटप करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार भाजपचे तालुकाध्यक्ष रुपेश कदम यांनी रविवारी कांदे, टमाटे, बटाटे, कोबी, मिरची आदी भाजीपाल्याची पॅकिंग करून माळधावंडा, जांब, निमटोक, टव्हा, पोतरा आदी गावांत गरजूंना वाटप केले.
सोशल डिस्टन्स पाळले
पोतरा येथील हनुमान मंदिराच्या परिसरात सोशल डिस्टन्स पाळत भाजीपाला वाटप करण्यात आला. या वेळी रुपेश कदम यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मारोतराव देशमुख, उपसरपंच द्वारकाबाई मुलगीर, विजयराव मुलगीर, सोपान रणवीर, भाऊराव चेभेले, भाऊराव खुडे, श्यामराव रायपुरे, विकास रानगिरे आदींची उपस्थिती होती.