Maratha Reservation : मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरूच

मराठा आरक्षण : रास्ता रोको, मुंडण, अन्नत्याग, लाक्षणिक उपोषणद्वारे जरांगे यांना समर्थन
Protests continue at various places in Marathwada Maratha Reservation Support roadblocks shaving food sacrifice hunger strike
Protests continue at various places in Marathwada Maratha Reservation Support roadblocks shaving food sacrifice hunger strikesakal

जालना : अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकाराला एका महिन्याची मुदत दिली असली, तरी त्यांना समर्थन देण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये ठिकठिकाणी विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत.

केज तालुक्यात रास्ता रोको

केज : अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथील उपोषणाला पाठिंबा, तेथील लाठीमाराचा निषेध आणि आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यात ठिकठिकाणी वेगवेगळी आंदोलने होत आहेत. येथील खामगाव-पंढरपूर मार्गावरील (केज-कळंब मार्ग) सुर्डी फाटा (ता. केज) येथे मंगळवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

अन्नत्याग, लाक्षणिक उपोषण

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे या तरुणाने दहा सप्टेंबरपासून अन्नत्याग सुरू केले आहे. त्याच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता. आरक्षणाच्या मागणीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार त्याने केला आहे. चंदन सावरगाव व काळेगाव घाट येथेही दोन दिवसांपासून लाक्षणिक उपोषण सुरू आहे. आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

लातूरमधील उपोषणकर्त्यावर उपचार

लातूर : अंतरवाली सराटीतील उपोषणाला पाठिंबा म्हणून पाखरसांगवी (ता. लातूर) येथील आदित्य अप्पासाहेब देशमुख या तरुणाने येथील तहसील कार्यालयसमोर सहा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपोषणस्थळीच त्याला सलाईन लावण्यात आले होते.

तेरमधील तरुणांचे मुंडण

तेर (ता. धाराशिव) : मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तेर येथील संजय जाधव, पांडुरंग मुळे, सोमनाथ आबदारे, गणेश देशमुख यांनी गावात उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासह सकल मराठा समाजातील नागरिकांच्या वतीने जुने बसस्थानक येथून पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण सुरू करण्यात आले. या वेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ अनेक तरुणांनी मुंडण केले.

महिला उपसरपंचाचा राजीनामा

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : कान्हेगाव (ता. कळमनुरी) येथील उपसरपंच सुलोचना तुकाराम वाघमारे यांनी राजीनामा देऊन मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मुख्य भूमिकेतून त्यांनी राजीनामा दिला आहे.

उपोषण मंडपातच तरुणाचे विषप्राशन

उमरखेड (जि. यवतमाळ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या मंडपात एका तरुणाने विषारी औषध प्यायल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. आज दुपारी एक वाजता ही घटना घडली. मागील सात दिवसांपासून येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात हे उपोषण सुरू आहे.

अशोक देवराव जाधव (वय ३५) हा तरुण उपोषणकर्त्यांशी बोलण्यासाठी मंडपात गेला. तेथेच बसून त्याने आरक्षणाची मागणी करीत खिशातील कीटकनाशकाची बाटली काढली व त्यातील विषारी औषध प्यायला. ही बाब इतर उपोषणकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी जाधव याच्या हातातील बाटली घेऊन फेकली. मात्र, तोपर्यंत त्याने विष प्यायले होते. जाधव याला तत्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com