esakal | विहिरीच्या कामावर गावातील मृत महिलेचे नाव दाखविण्याचा प्रताप उघडकीस
sakal

बोलून बातमी शोधा

mnrega

सारणी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे सध्या काम सुरू आहे. या विहिरीच्या कामावर गावातील मृत महिलेचे नाव दाखविण्याचा प्रताप उघडकीस आला.

विहिरीच्या कामावर गावातील मृत महिलेचे नाव दाखविण्याचा प्रताप उघडकीस

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (बीड) : सारणी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे सध्या काम सुरू आहे. या विहिरीच्या कामावर गावातील मृत महिलेचे नाव दाखविण्याचा प्रताप उघडकीस आला. विशेष म्हणजे जुलै २०१५ रोजी ही महिला मृत झाल्याची नोंद ग्रामपंचायतच्या जन्म-मृत्यू अभिलेखात करण्यात आलेली आहे. 

तालुक्यात मनरेगाअंतर्गत अनियमिततेची तक्रार आली होती. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केज तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीची वर्ष २०१९-२० व २०२०-२१ मध्ये झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील एकशे चौदा ग्रामपंचायतींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या पथकाने मंगळवारपासून (ता.सहा) कामांची प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात केली आहे.

पथकांची चौकशी सुरू होताच अनेक ग्रामपंचायतींनी केलेले घोटाळे उजेडात येऊ लागले आहेत. यामध्ये सारणी (आनंदगाव) ग्रामपंचायतीने वर्ष २०१५ मध्ये मृत झालेल्या सुभद्रा व्यंकटी सोनवणे या महिलेच्या नावाने मस्टर भरून ग्रामपंचायतने पैसे उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आठ जुलै २०१५ रोजी वयाच्या ७० व्या वर्षी मृत झाल्याची नोंद ग्रामपंचायतीच्या जन्म-मृत्यू अभिलेखात करण्यात आलेली आहे. 

तरीही ती या कामावर १२ मार्च २०२० ते १८ मार्च २०२०, ता.२० मार्च २०२० ते २५ मार्च २०२० व ता. २३ एप्रिल २०२० ते ०६ मे २०२० या कालावधीत हजर असल्याची नोंद आहे. याबाबत गावातील तरुण बाप्पासाहेब भागवत सोनवणे यांनी तक्रार केली असून यामध्ये दोषी असलेले सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत; तसेच इतरही अनेक कामात अनियमितता झाली असून त्याची चौकशी करावी. अन्यथा आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले