धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी याद्या प्रसिद्ध करा, लातूरच्या पालकमंत्र्यांची सूचना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

कोरोनामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात रेशन दुकानातून धान्याचे वाटप सुरू झाले आहे. यात काळाबाजार होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक रेशन दुकानाच्या बाहेर धान्याचे वाटप झाले आहे, अशा लाभार्थींच्या याद्या लावाव्यात; तसेच ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या बाहेर अशा याद्या लावाव्यात, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.

लातूर ः कोरोनामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात रेशन दुकानातून धान्याचे वाटप सुरू झाले आहे. यात काळाबाजार होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक रेशन दुकानाच्या बाहेर धान्याचे वाटप झाले आहे, अशा लाभार्थींच्या याद्या लावाव्यात; तसेच ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या बाहेर अशा याद्या लावाव्यात, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. दुकानात किती धान्य आले व किती वाटप झाले हे लोकांना कळू द्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या टाळेबंदी सुरू आहे. या काळात अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. हातावर पोट असल्याची मोठी अडचण झाली आहे. या काळात गरीब लोक उपाशी राहू नयेत म्हणून राज्य शासनाच्या वतीने रेशन दुकानातून मोठ्या प्रमाणात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या वतीने देखील असे धान्य दिले जात आहे. हे सर्व धान्य राज्य शासनाच्या वतीने रास्त भाव दुकानातून वाटप केले जात आहे. ज्या लाभार्थींना अन्नधान्याचे वाटप झाले आहे त्याच्या याद्या रास्त भाव दुकानाच्या बाहेर आणि ग्रामपंचायतीच्या बाहेर लावण्याच्या सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या आहेत.

वाचा ः नागरिकांच्या आरोग्यासाठी लढा सुरुच, अर्चना पंडगे कोरोनाशी करताहेत दोन हात

नुकसानीचे पंचनामे तातडीने करा
लातूर जिल्ह्यात शनिवारी (ता.१८) काही निलंगा, रेणापूर, लातूर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले. गारा व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याचा मोठा फटका फळभाज्या, रब्बी पिकांना बसला आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री तांदूळवाडी (ता.लातूर) येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत; तसेच या शेतकऱ्याच्या कुटुंबीयाला तातडीने मदत करावी असे आदेश पालकमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी (ता.१९) दिले. जिल्ह्यात सर्वाधिक औराद शहाजनी परिसरात शनिवारी ५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. रविवारी प्रशासनाच्या वतीने औराद शहाजनीसह ज्या-ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Publish Ration Benefisharies List, Latur Guardian Minister Instruction