esakal | शेतकऱ्यांच्या घरूनच होणार शेतमालाची खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

sengaw Bajar samiti

सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘बाजार समिती आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरूनच आता थेट बाजार समिती शेतमाल खरेदी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होणार आहे. 

शेतकऱ्यांच्या घरूनच होणार शेतमालाची खरेदी

sakal_logo
By
जगन्नाथ पुरी

सेनगाव (जि. हिंगोली): लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना घरातील शेतमाल विक्री करण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘बाजार समिती आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरूनच आता थेट बाजार समिती शेतमाल खरेदी करणार आहे.

राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावा म्हणून सरकारकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाउन परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेऊन विक्री करणे अवघड झाले आहे.

हेही वाचा  कळमनुरीत बाराशे कर्मचाऱ्यांना विमा कवच

शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट

 फळ लागवड व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा माल शेतातच खराब होत आहे. परिसरातील आठवडे बाजार बंद असल्यामुळे काही शेतकरी गावातच भाजीपाला विक्री करीत आहेत. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. घरात शेतमाल आहे. मात्र, तो विक्री करावा कुठे हा प्रश्न अनेकांना सतावत आहेत. 

बाजार समिती आपल्या दारी उपक्रम

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन सामाजिक दायित्व म्हणून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीसाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. ‘बाजार समिती आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे बाजार समितीतील व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन माल खरेदी करणार आहेत.

जागेवरच पैसे दिले जाणार 

 शेतमालाचे मोजमाप करून तत्काळ तिथेच शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करावयाचा असल्यास त्यांनी तत्काळ समितीचे सचिव, निरीक्षक, व्यापारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ३० क्विंटल पेक्षा जास्त शेतमाल असल्यास बाजार समितीचे वाहन सुद्धा संबंधित गावात जाणार आहे.


मालाचे वजन करून खरेदी 

शेतकऱ्यांनी व्हॉट्ॲपवर मालाचा फोटो काढून समितीकडे पाठवायचा आहे. योग्य भावानुसार शेतकऱ्यांच्या घरी मालाचे वजन करून खरेदी केली जाणार आहे. त्याचे पैसे दिले जाणार आहेत. दरम्यान, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. तसेच आर्थिक टंचाईपासून सुटका होण्यास मदत होणार असल्याने या निर्णयाचे शेतकऱ्यांतून स्वागत केले जात आहे.  

येथे क्लिक करा - हिंगोलीत स्वच्छता कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण


शेतकऱ्यांच्या घरूनच शेतमाल खरेदी

बाजार समितीचा मुख्य घटक शेतकरी आहे. लॉकडाउन परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी गैरसोय होऊ नये म्हणून समितीने ‘बाजार समिती आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या घरूनच शेतमाल खरेदी केला जाणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
-दत्तात्रय वाघ, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती