परदेशातून आलेल्यांना घ्यायला हॉटेलचालकांकडून नकार, आयटीआयमध्ये करणार क्वारंटाइन  

दत्ता देशमुख
Monday, 11 May 2020

कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात परदेशातून ११८ जण पोचले आहेत. सध्या हे सर्वजण क्वारंटाइनच्या बाहेर आले आहेत. लॉकडाउननंतर आता केंद्र सरकारने परदेशातील लोकांना खास विमानाने देशात आणले आहे.

बीड - परदेशातून आलेल्या व्यक्तींना त्यांच्या खर्चाने हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चार हॉटेलही आरक्षित करण्याचे आदेश दिले; परंतु हॉटेलचालकांनी या लोकांना घेण्यास नकार दिल्याने चौघांना आयटीआयच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये जावे लागले. जिल्हा कोरोना शून्य असून सोमवारी (ता. ११) १२ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले. 

जिल्ह्यातून आतापर्यंत ३२८ व्यक्तींच्या ३४२ स्वॅबची तपासणी करण्यात आली. या सर्वच स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, १४ जणांचे स्वॅब रिपिट घेण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षातून २६६, अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षातून ६९ तर केज उपजिल्हा रुग्णालयातून पाच व परळी उपजिल्हा रुग्णालयातून दोन असे एकूण ३४२ स्वॅब घेण्यात आले आहेत. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, परजिल्ह्यातून आलेले १२० जण होम क्वारंटाइन असून ६५ जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन आहेत. सोमवार सायंकाळपर्यंत जिल्ह्यात ४५ हजार ५१३ ऊसतोड मजूर परतल्याची नोंद आहे. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात परदेशातून ११८ जण पोचले आहेत. सध्या हे सर्वजण क्वारंटाइनच्या बाहेर आले आहेत. लॉकडाउननंतर आता केंद्र सरकारने परदेशातील लोकांना खास विमानाने देशात आणले आहे. यात जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. दरम्यान, अशा लोकांना त्यांच्या खर्चाने हॉटेलमध्ये अलगीकरणात ठेवण्यात येणार होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी (ता. दहा) आदेश काढून हॉटेल विघ्नहर्ता, यशराज इन, हॉटेल अन्विता व सागर हे चार हॉटेल आरक्षित करण्याचे आदेश काढले होते. परंतु, या हॉटेल व्यवस्थापनांनी परदेशातून आलेल्यांना ठेवण्यास नकार दिल्याने आलेल्या चौघांना आयटीआयमध्ये तयार केलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine will be done in ITI

Tags
टॉपिकस
Topic Tags: