रेल्वेगाडी अंगावरून गेली, तरी साधे खरचटलेही नाही!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 September 2019

धडधडती रेल्वेगाडी अंगावरून गेली, तरी साधे खरचटलेही नाही! ही घटना बुधवारी (ता. चार) मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाजवळ घडली. 

धोंडोपंत रामराव वडीकर (वय ७७, रा. जालना, सध्या रा. स्वप्ननगरी, गारखेडा) असे या घटनेतून बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सकाळी आठच्या सुमारास नगरसोल-नांदेड ही रेल्वे मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर येत होती. रेल्वेस्थानक जवळच असल्याने रेल्वेचा वेगही कमी झाला होता. असे असतानाच अचानक एक व्यक्ती दोन्ही रुळांमध्ये झोपलेली असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक मारला.

औरंगाबाद - धडधडती रेल्वेगाडी अंगावरून गेली, तरी साधे खरचटलेही नाही! ही घटना बुधवारी (ता. चार) मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाजवळ घडली. 

धोंडोपंत रामराव वडीकर (वय ७७, रा. जालना, सध्या रा. स्वप्ननगरी, गारखेडा) असे या घटनेतून बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सकाळी आठच्या सुमारास नगरसोल-नांदेड ही रेल्वे मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर येत होती. रेल्वेस्थानक जवळच असल्याने रेल्वेचा वेगही कमी झाला होता. असे असतानाच अचानक एक व्यक्ती दोन्ही रुळांमध्ये झोपलेली असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक मारला.

मात्र, तरीही गाडी त्या व्यक्तीच्या अंगावरून हळूहळू पुढे गेल्यानंतर रेल्वेचा पूर्ण ब्रेक लागला. गाडी थांबताच प्रवाशांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. चांगली बाब म्हणजे सदर व्यक्‍ती निपचित पडून राहिल्याने साधे खरचटलेही नाही. 

दरम्यान, पोलिसही दाखल झाले. वडीकर यांना आपले नाव व पत्ता निटसा सांगता येत नव्हता, त्यामुळे पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांना माहिती देऊन नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार गोर्डे पाटील, किरण जोशी, पोलिस कर्मचारी बी. एन. ईथर यांनी बराच वेळ त्यांना बोलते केल्यानंतर ते काहीसे बोलू लागले. स्मृतिभ्रंश होत असल्याने त्यांच्यावर उपचारही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जालना येथून जिल्हा परिषदेतून अभियंता पदावरून निवृत्त झालेले धोंडोपंत वडीकर हे औरंगाबादला मुलगा धनंजय यांच्याकडे आले होते. घरात मुलाची सासू आजारी असल्याने काहीतरी कुरबुर झाल्याने ते सरळ रेल्वेपटरीकडे आले होते. दरम्यान, वडील गायब झाल्याने मुलगा धनंजय याने शोधाशोध सुरू केली होती, अखेर काहीच माहिती मिळत नसल्याने धनंजय वडीकर हे पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आले, तेव्हा वडील दिसताच त्यांनी वडिलांना मिठीच मारली. सर्वांचे आभार मानत त्यांनी वडिलांना घरी नेले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Dhondopant Wadikar Life Saving