नाईट पेट्रोलींगमुळे टळला रेल्वे अपघात

भास्कर लांडे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

कशामुळे समोर आला प्रकार
हिवाळ्यातील थंडीमुळे रूळ अंकुचन पावतो. त्यामुळे रूळाला तडे जातात. म्हणून हिवाळ्याच्या सुरूवातीपासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत पेट्रोलींग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येते. त्यातील प्रत्येक पेट्रोलमॅन दर दोन किलो मीटर अंतरावर रूळाची पाहणी २४ तास करीत असतो. ती पाहणी सोमवारी चोख पद्धतीने केल्याने हा प्रकार लक्षात आला.

परभणी : रेल्वेरूळ तुटल्याचे पाहताच सिग्नल दिलेली गाडी थांबविल्याने रविवारी (ता.१६) रात्री परभणी-पंढरपूर गाडीचा अपघात टाळता आला. तो नाईट पेट्रोलींग व्यवस्थीत झाल्याने अनर्थ टळून गाडीतील हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उदभवला नाही. 

मागील चार दिवसांपासून निझामाबाद-पंढरपूर गाडी निझामाबाद ऐवजी परभणीहून सोडण्यात येऊ लागली. ती रविवारी सायंकाळी ६.२० ऐवजी रात्री दिड तास उशीराने परभणीहून सोडण्यात आली. रात्री सव्वा आठ वाजता नृसिंह पोखर्णी (ता.परभणी) स्थानकावर पोहचली. तत्पूर्वीच रेनीगुंठा-औरंगाबाद गाडी थांबल्याने क्रॉसींगला वेळही लागला नाही. लागलीच ग्रीन सिग्नलही मिळाल्याने गाडीने हॉर्नही वाजवले. तेवढ्यात सिग्नल रेड झाल्याने चालकाने गाडी पुढे सोडली नाही. तेव्हा अन्य गाडीची क्रॉसींग देखील पोखर्णीलाच ठेवली, असे प्रवाशांना वाटले. परंतु अर्धा तास, एक तास झाला तरीही पंढरपूर गाडी जाग्यावरून हालली नाही. ती गंगाखेड रेल्वेस्थानकावरून निरोप आल्याने थांबविली होती. कारण गंगाखेड ते धोंडी स्थानकादरम्यानच्या मुळी गावाजवळ रविवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेदरम्यान रूळ तुटला होता. ते ठिकाण गेट क्रमांक १३ जवळील ३०२/७-८ किलो मीटरजवळील होते. हा प्रकार पेट्रोलींग करीत असताना नंदकुमार गुजर यांच्या लक्षात आला.

श्री. गुजर यांनी गंगाखेड रेल्वे स्थानकावरील पीडब्ल्युआय विभागाला तातडीने माहिती कळवली. लागलीच पीडब्ल्युआय विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी पोखर्णी स्टेशन मास्तरांना तात्काळ निरोप देवून पंढरपूर गाडी पोखर्णीवर थांबवून ठेवली. सुदैवाने एकही गाडी तुटलेल्या रूळावरून गेली नव्हती. गंगाखेडवरून रेनीगुंठा-औरंगाबाद गाडी गेल्यानंतर हा प्रकार झाला होता. तोपर्यंत पंढरपूर गाडीमधील प्रवाशी टाकळल्याने त्यांनी स्टेशन मास्तरकडे ओरड सुरू केली. तेव्हा प्रवाशांना हा प्रकार समजला. त्यावेळी प्रवाशांनी हानी टळल्याची भावना व्यक्त केली. जवळपास सव्वा तास उशिराने म्हणजे ९.३४ वाजता पंढरपूरगाडी गंगाखेडकडे रवना केली. 

काही गाड्यांवर परिणाम 
दुरूस्तीचे काम होईपर्यंत गंगाखेड स्थानकावर थांबविलेली बँगलुरू- नांदेड एक्सप्रेस अत्यंत धिम्या गतीने परभणीकडे सोडली. तिची पोखर्णी स्थानकावरील पंढरपूरसोबत क्रॉसिंग केली. अन्य औरंगाबाद- हैद्राबाद आणि अकोला-परळी गाडी परभणी रेल्वे स्थानकावरील प्लॅट क्रमांक दोन व तीनवर थांबवून ठेवल्या होत्या. त्याचा परिणाम औरंगाबादकडे जाणार्‍या गाड्यांवर झाला. तसेच रविवारी रात्री आठपासून ते सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत प्रत्येक गाडी घटनास्थळी थांबविण्यात येऊ लागली. शिवाय, गंगाखेड-धोंडीचे अंतर पार करण्यासाठी २० मिनीटांचा कालावधी लागत आहे.   

कशामुळे समोर आला प्रकार
हिवाळ्यातील थंडीमुळे रूळ अंकुचन पावतो. त्यामुळे रूळाला तडे जातात. म्हणून हिवाळ्याच्या सुरूवातीपासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत पेट्रोलींग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येते. त्यातील प्रत्येक पेट्रोलमॅन दर दोन किलो मीटर अंतरावर रूळाची पाहणी २४ तास करीत असतो. ती पाहणी सोमवारी चोख पद्धतीने केल्याने हा प्रकार लक्षात आला.

Web Title: railway track break near Parbhani