Avkali Paus: अवकळीचा तडाखा : शेतीपिकांचे प्रचंड नुकसान; शेतकरी आर्थिक संकटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain crop damage farmer financial issue agriculture weather

अवकळीचा तडाखा : शेतीपिकांचे प्रचंड नुकसान; शेतकरी आर्थिक संकटात

कायगाव : विजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्या सोबत आलेल्या अवकाळी पावसाने सोमवारी( ता.6) मार्च रोजी रात्री आठला कायगाव (ता.गंगापूर)परिसराला चांगलेच झोडपले. यामुळे काढणी आलेले गहू,कांदा,हरभरा आदी रब्बी पिकांचे मोठे नुकसान असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई मोबदला मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. अवकाळी पावसाने कायगाव व परिसरातील जामगाव, नवाबपूर, बगडी,ममदापूर,अगरकानडगाव,अमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, पखोरा,भेंडाळा, गळनिंब, भिवधानोरा,अगरवाडगाव ,धनगरपट्टी आदी गाव शिवारात हजेरी लावली.

अनेक भागात काढणी आलेला गहू भुईसपाट झाला तर हरभरा भिजला.कांद्याला ही मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या शेत बांधावरील आंबा ,चिंच ,चिकू आदी फळ झाडांचे अतोनात नुकसान झाले.

एकीकडे कांदा,कापूस,गहू,सोयाबीन या शेत मालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले असून शेतीपिकास केलेला खर्च देखील निघण्याची शाशवती राहिली नाही.

त्यामुळे ते मेटाकुटीला आले आहे.त्यात गत वर्षीची अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा अद्याप मिळाला नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.

अश्यातच पुन्हा निसर्गाच्या लहरी फटक्याने खरीप सारखे रब्बीत ही शेतीमालाचे अतोनात नुकसान केल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.शेती पिकांना हमीभाव नसल्याने आणि निसर्गाच्या लहरी फटक्याने दिवसेंदिवस शेती तोट्याची होत चालली आहे.

त्यात ऊन,पावसाळा,आणि हिवाळा या ऋतूत वर्षभर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अवकळा झाली आहे. अवकाळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

प्रशासन, शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गंगापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुमित मुंदडा,

शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके, शेतकरी पांडुरंग वाघ, भाऊसाहेब नवले,गंगाधर वायसळ,इसाभाई पठाण,ज्ञानेश्वर भोजने,बुऱ्हाण पठाण,रशीद पठाण,अस्लम पठाण,कचरू चव्हाण,प्रदीप दारकोंडे, रामेशवर गायकवाड आदींनी मागणी केली आहे