esakal | निसर्गाच्या काळजाला फुटला पाझर  
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभार पिंपळगाव : परिसरात रविवारी सायंकाळी आकाशात दाटून आलेले ढग.

तीर्थपुरी (जि. जालना) - जिल्ह्यातील अनेक भागांत भरपावसाळ्यात कोरडे नदी-नाले, तहानलेली पिके, आकाशाकडे एकटक पाहणारा शेतकरी असे चित्र होते. दुष्काळाची टांगती तलवार कायम होती; मात्र गेल्या तीन दिवसांतच हे चित्र बदलत चालले आहे. जणू निसर्गाच्या काळजाला पाझर फुटला, जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने मुसंडी मारली. रविवारी (ता. एक) कोरडेठाक असलेले अनेक नदी-नाले आता दुथडी वाहताना दिसत होते. 

निसर्गाच्या काळजाला फुटला पाझर  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तीर्थपुरी (जि. जालना) - जिल्ह्यातील अनेक भागांत भरपावसाळ्यात कोरडे नदी-नाले, तहानलेली पिके, आकाशाकडे एकटक पाहणारा शेतकरी असे चित्र होते. दुष्काळाची टांगती तलवार कायम होती; मात्र गेल्या तीन दिवसांतच हे चित्र बदलत चालले आहे. जणू निसर्गाच्या काळजाला पाझर फुटला, जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने मुसंडी मारली. रविवारी (ता. एक) कोरडेठाक असलेले अनेक नदी-नाले आता दुथडी वाहताना दिसत होते. 

घनसावंगी तालुक्‍यातील तीर्थपुरी परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने जणू दुष्काळासारखीच स्थिती होती. पावसाभावी शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, सोयाबीन व मूग ही पिके सुकू लागली होते. गोदावरी नदीकाठ आणि डाव्या कालव्याचा परिसर वगळला, तर अन्य भागात पाणीप्रश्‍नही बिकट होण्याच्या मार्गावर होता; मात्र गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने मोठा दिलासा मिळाला. अगदी दोन दिवसांपूर्वी कोरड्याठाक पडलेल्या नदी-नाल्यांना पाणी आले. त्यामुळे गावकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

या भागातील खालापुरी, खडका, मुरमा, अंतरवाली टेंभी, बानेगाव, दैठणा, रामसगाव, साडेगाव, दहिगव्हाण आदी भागांत जोरदार पाऊस झाला आहे. नदी-नाले असलेल्या भागातील विहिरींच्या पाणीपातळीत आता वाढ होणार आहे. पावसात सातत्य राहिल्यास सध्यातरी या ठिकाणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. 

कुंभार पिंपळगावात दुसऱ्या दिवशीही पाऊस 
कुंभार पिंपळगाव  - परिसरात रविवारी (ता. एक) मध्यरात्री त्यानंतर पहाटे व पुन्हा सायंकाळी साडेपाच वाजता जोरदार पाऊस झाला. पावसाने नदी-नाले खळखळून वाहू लागले. अनेक शेतांतील पिकांतही पाणीच पाणी झाले. सायंकाळी साडेपाच वाजता आकाशात काळेकुट्ट ढग दाटले होते. जणू ढगफुटी होण्याचीच भीती दाखवत होते. यामुळे शेतातील मजूर त्याचप्रमाणे खरेदीसाठी गावात खेड्यावरून आलेल्या लोकांची एकच धावपळ उडाली. तेवढ्यात जोरदार पावसाला सुरवात झाली.

गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी पावसाची वाट पाहत होते. पाण्याअभावी सोयाबीन व मुगाचे पीक काही प्रमाणात वाया गेले असले, तरी काही पिकांना फायदा झाला आहे. यावर्षी नदीला प्रथमच काही प्रमाणात पाणी आले आहे. 
- बाळासाहेब जाधव
शेतकरी, उढाण कंडारी 

loading image
go to top