वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडियाच्या यादीत राजश्री पाटील

शिवचरण वावळे
Thursday, 12 March 2020

नांदेडला तीन बचतगटापासून ते पाच राज्यात गोदावरी मल्टी स्टेट अर्बन बँकेचे विस्तार करणाऱ्या गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील ह्या मागील काही वर्षापासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटत आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक महिलांना उद्योग व्यवसायासाठी पुढे घेऊन जात ४५ हजार महिलांना रोजगार प्राप्त करुन देण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

नांदेड : देशाच्या अर्थव्यवस्थेला गतीमान करण्यासाठी आणि महिला उद्योग, व्यवसाय व उपक्रमांना चालना देऊन औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिलांची निवड नीती आयोग हा महिला उद्योजकता व्यासपीठांतर्गत वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या पुरस्कारासाठी करत असतो. 

२०१९ च्या पुरस्कारासाठी ‘महिला उद्योजकता’ ही संकल्पना समोर ठेवून देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी पारंपरिक व्यवसायासोबत आणि बदलत्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या आव्हानांना पार करत विविध औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या देशातील शंभर महिलांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ता. आठ मार्च रोजी ‘सुषमा स्वराज’ भवन नवी दिल्ली येथे गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, सचिव ऑना राव यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यात टॉप १५ महिला उद्योजकांना पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा- नांदेडला ‘कोरोना’चा तिसरा संशयीत

शंभर महिलांची यादी घोषित
अनेक कसोट्या पार करीत देशातील विविध मान्यवर परीक्षकांच्या चाचणीतून देशभरातील दोन हजार तीनशे महिलांची निवड शेवटच्या टप्प्यासाठी करण्यात आली होती. यातून देशातील अव्वल शंभर महिलांची ‘ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ ची यादी घोषित करण्यात आली. यामध्ये गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली. 

देशातील महिलांना ‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ पुरस्कार
केंद्र शासनाचे विकास धोरण ठरविणारी सर्वोच्च संस्था म्हणून नीती आयोग कार्य करते. पंचवार्षिक योजना राबविण्यामध्ये नीती आयोगाची भूमिका खूप महत्वपूर्ण मानले जाते. देशाच्या विकासाच्या दृष्टीने नवनवीन ध्येय धोरणे ठरविणे आणि ते अंमलात आणणे, यावर ही संस्था नियंत्रण ठेवते. नीती आयोगाचा प्रमुख उपक्रम असलेल्या महिला उद्योजकता व्यासपीठ आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या सहकार्याने दरवर्षी देशातील शंभर महिलांना ‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ पुरस्काराने गौरविण्यात येते. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून देशाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बदलासाठी स्वत:च्या कार्यातून सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या महिला उद्योजकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. 

हेही वाचलेच पाहिजे- पत्‍नी- पत्‍नीच्या भांडणात नऊ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्‍यू

भरीव योगदान
या कार्यक्रमात देशातील अव्वल शंभर महिलांमध्ये गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांची निवड करण्यात आली होती. ही महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब आहे. राजश्री पाटील यांचे बचत गट, सहकार, सामाजिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान पाहून त्यांच्या कार्याची दखल घेत २०१९ च्या शंभर महिलांच्या यादीत निवड करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajashree Patil In The List Of Women Transforming India Nanded News