राजेश नहारचा घात गावठीच्या गोळीनेच... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

राजेश नहार याचा खून करण्यासाठी मारेकऱ्यांनी गावठी पिस्तूलचा वापर केला आहे. 7.65 एमएम गावठी पिस्तूलमधून मारेकऱ्याने दोन गोळ्या नहार याच्यावर झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी त्याच्या कानाखाली लागली होती, त्यातच तो गतप्राण झाला होता.

जालना - परतूर येथील व्यापारी राजेश नहार याच्यावर पाच दिवसांपूर्वी जालना-वाटूर महामार्गावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. नहार याच्यावर 7.65 एमएम गावठी पिस्तुलाने गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. दरम्यान, पाच दिवस उलटल्यानंतरही हाती अजून काही महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले नसले तरी पोलिसांकडून चौफेर दिशेने सर्व शक्‍यता पडताळून तपास केला जात आहेत. काही जणांची चौकशीही करण्यात आली आहे. 

हेही वाचा : राजेश नहारचा गोळ्या झाडून खून 

परतूर येथील व्यापारी राजेश नहार हा मागील काही महिन्यांपासून अधिक चर्चेत आला होता. नहार याने व्यापारी विलमराज सिंघवी आणि बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांची सुपारी दिल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणून त्याला अटक केली होती. तेव्हापासून नहार अधिक चर्चेत आला होता. या दोन्ही प्रकरणांत जामिनावर बाहेर आलेल्या नहारचा शनिवारी (ता.11) रात्री रस्त्यावर गाठून गोळ्या झाडून खून करण्यात आला. नहार याचा खून करण्यासाठी मारेकऱ्यांनी गावठी पिस्तूलचा वापर केला आहे. 7.65 एमएम गावठी पिस्तूलमधून मारेकऱ्याने दोन गोळ्या नहार याच्यावर झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी त्याच्या कानाखाली लागली होती, त्यातच तो गतप्राण झाला होता.

हेही वाचा : जालन्याचे बिल्डर मुनोतही होते नहारचे टार्गेट

या घटनेनंतर जिल्ह्यातील पुन्हा गावठी पिस्तूल पुरविणारे रॅकेट सुरू झाले आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने नहार खून प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके तैनात केली असून काही जणांची चौकशी पोलिसांनी केली आहे; तसेच पोलिसांकडून एकाच दिशेने तपास न करताना चौफेर दिशेने तपास सुरू केला असून सबळ पुरावे गोळा केले जात आहेत.  

राजेश नहार खून प्रकरणात चौफेर दिशेने तपास केला जात आहे. नहारवर 7.65 एमएम गावठी पिस्तुलाने फायर झाले आहे. गावठी पिस्तूल पुरविणाऱ्या एका टोळीचा यापूर्वीच पर्दाफाश केला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात कोणी आणि कुठून गावठी पिस्तूल पुरविण्यात आली याचाही शोध घेतला जात आहे. 
- चैतन्य एस., पोलिस अधीक्षक, जालना. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajesh Nahar murder case of Jalna