औरंगाबाद शहरात साकारलेय रामकृष्ण मिशनचे भव्य मंदिर

Aurangabad
Aurangabad
Updated on

औरंगाबाद : एकाहून एक सुंदर ऐतिहासिक वास्तूंनी नटलेल्या औरंगाबाद शहराच्या भूषणात भर घालेल, अशी उत्कृष्ट स्थापत्यशैली असलेले रामकृष्ण मिशनचे भव्य मंदिर बीड बायपासवरील आश्रमाच्या जागेत उभे राहिले आहे. कुठल्याही कंत्राटदाराविना तब्बल नऊ वर्षे 28 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या 100 फूट उंच मंदिराचा तितकाच भव्यदिव्य लोकार्पण सोहळा येत्या महिन्यात तीन दिवस चालणार आहे. शहरवासीयांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे खास आमंत्रण मठाचे प्रमुख स्वामी विष्णुपादानंद यांनी दिले आहे. 

बीड बायपास रोडवरील तीन एकर जागेवर वीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रामकृष्ण मठात नागरिक श्रद्धेने जातात. सर्व धर्मीयांसाठी खुल्या असलेल्या या मठात सर्वच धर्मांच्या वास्तुशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा समावेश असलेल्या, स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठात (पश्‍चिम बंगाल) सव्वाशे वर्षांपूर्वी उभारलेल्या भव्य मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा संकल्प स्वामी विष्णुपादानंद यांनी केला आणि त्याला भाविकांनीही साथ दिली. कोलकाता येथील बेलूर मठ व्यवस्थापनाने तेथील मंदिराची प्रतिकृती बांधण्याची परवानगीही दिली आणि काम सुरू झाले. 

वाराणसीहून आणला दगड 
2009 मध्ये मंदिराचे काम सुरू झाले. अद्ययावत तंत्रज्ञान वापरूनही ऐतिहासिक स्थापत्याचे वैशिष्ट्य जपणारे हे मंदिर वाराणसीहून खास मागवलेल्या पिवळसर-लाल वालुकाश्‍मातून घडवले आहे. शिवाय संगमरवर आणि सागवानी लाकडाचाही खुबीने वापर केला आहे. तब्बल 40 फूट खोल भक्कम पायावर उभारलेल्या या मंदिराची उंची 100 फूट आहे. हे मंदिर भूकंपरोधक आहे. 

रोमन, गॉथिक, इस्लामी शैली 
स्वामी विवेकानंदांनी जगभर फिरून वेगवेगळ्या स्थापत्यशैलींचा अभ्यास करून आपल्या कल्पनेतील मंदिराला बेलूर येथे मूर्त रूप दिले. रोमन चर्चच्या शैलीतील कळस, गॉथिक शैलीतील खिडक्‍या, रजपूत शैलीचे घुमट, इस्लामी स्थापत्याचीही कित्येक वैशिष्ट्ये या बांधकामात दिसून येतात. सर्व धर्माच्या नागरिकांना हे मंदिर आपले वाटावे, याची काळजी घेण्यात आली आहे. 

भव्य लोकार्पण सोहळा 
रामकृष्ण मिशनचे प्रमुख स्वामी, साडेतीनशे संन्यासी आणि जगभरातील पाच हजार प्रतिनिधींच्या उपस्थितीत भव्य उद्‌घाटन सोहळा होईल. 16 नोव्हेंबरला स्वामी विवेकानंद दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी यज्ञयागाबरोबरच दिवसभर युवक संमेलन चालेल. यात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची भाषणे, नाटिका, संगीत, असे कार्यक्रम होतील. दुसऱ्या दिवशी (ता. 17) मंदिरात मूर्तींचीय प्राणप्रतिष्ठा, श्रीमत्‌ स्वामी वागीशानंदजी महाराज यांची सभा, व्याख्याने आणि तिसऱ्या दिवशी (ता. 18) श्री रामकृष्ण भक्त संमेलनाने समारंभाचा समारोप होईल.  

"भक्तांच्या देणगीतून हे मंदिर उभारले जात आहे. ते मराठवाड्याचे आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनेल, यात शंका नाही. सर्वधर्मीय भाविकांबरोबरच पर्यटकही हे मंदिर पाहण्यासाठी येतील.'' 
-स्वामी विष्णुपादानंद, प्रमुख, रामकृष्ण आश्रम.

- नऊ वर्षे चालले काम
- 28 कोटींचा खर्च 
- 100 फूट उंची 
- तळघरात 80 बाय 75 फूट भव्य सभागृह 
- 70 बाय 40 फुटांचे ध्यान मंदिर 
- 24 बाय 24 फुटांचा तीन मजली गाभारा 
- शंभर फूट उंची गाठण्यासाठी अंतर्गत जिने 
- भोवताली सुशोभित उद्यान
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com