औरंगाबाद-जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

कैलास मगर
रविवार, 1 सप्टेंबर 2019

निल्लोड, ता. 31 (जि.औरंगाबाद) ः टाकळी जिवरग (ता. सिल्लोड) येथील गायरान जमिनीत बाहेरगावच्या लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासन कोणतेही पाऊल उचलत नसल्यामुळे ग्रामस्थांनी शनिवारी (ता.31) औरंगाबाद-जळगाव महामार्गावर निल्लोड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

निल्लोड, ता. 31 (जि.औरंगाबाद) ः टाकळी जिवरग (ता. सिल्लोड) येथील गायरान जमिनीत बाहेरगावच्या लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासन कोणतेही पाऊल उचलत नसल्यामुळे ग्रामस्थांनी शनिवारी (ता.31) औरंगाबाद-जळगाव महामार्गावर निल्लोड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

बाहेरगावच्या काही लोकांनी टाकळी जिवरग शिवारात गट क्रमांक 33 व 150 मध्ये अतिक्रमण करून ग्रामस्थांना मारहाण करणे व ठार मारण्याच्या धमक्‍या दिल्याच्या घटनेनंतर संबंधितांनी ता. 23 ऑगस्ट रोजी भगवान गणेश जिवरगसह आई व लहान मुलास बेदम मारहाण करून घरात तीन तास डाबून ठेवल्याच्या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तहसील व पंचायत समिती प्रशासनाला पोलिस संरक्षणात अतिक्रमण काढावे, नसता रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. सदरील लोकांचा ग्रामस्थांना मारहाण व त्रास देण्याचे काम वारंवार सुरू असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने ग्रामस्थांनी औरंगाबाद-जळगाव महामार्गावर निल्लोड फाटा येथे सुमारे तीनशे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.

याप्रकरणी ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे व पुढील कारवाई त्वरित करावी, अन्यथा ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. तहसील प्रशासनातर्फे मंडळ अधिकारी राजाराम सराणे व अव्वल कारकून आकाश तुपारे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर सरपंच नंदाबाई फुके, सेवासंस्था अध्यक्ष सुखदेव जिवरग, माजी सरपंच ज्ञानेश्वर वहाटुळे, परमेश्वर जिवरग, आप्पा जिवरग, दत्ता फुके, तंटामुक्ती अध्यक्ष आण्णा जिवरग, उपसरपंच राजू जिवरग, ग्रामपंचायत सदस्य गणेश जिवरग, काशीनाथ भानुसे, पंढरीनाथ फुके, शिवानंद फुके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दुतर्फा वाहतूक कोंडी
यावेळी 15 ते 20 मिनिटे चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक थांबल्याने महामार्गाच्या दुतर्फा लांबच लांब वाहने थांबली होती. वडोद बाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलन संपल्यानंतर वाहतूक सुरळीत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rasta Roko At Aurangabad-Jalgaon Highway