गेवराईच्या रेशन घोटाळ्यात फिर्यादी  नायब तहसीलदारालाच अटक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

गेवराई शहरालगतच्या एका गोदामावर सहा मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. त्या वेळी पोलिसांनी सर्वसामान्यांना वितरीत करावयाचे स्वस्त धान्य, शासकीय वितरण व्यस्थेतील रिकामे पोते आणि ट्रक असा ६९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बीड  - कोरोनाच्या महामारीत अडचणीत आलेल्या सर्वसामान्यांच्या रेशनच्या घोटाळ्यात फिर्यादी नायब तहसीलदार अशोक भंडारे यालाच विशेष तपास पथकाने शुक्रवारी (ता. २२) अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून भाजप कार्यकर्ता अरुण म्हस्के याची माफियागिरी उघड केली होती.

गेवराई शहरालगतच्या एका गोदामावर सहा मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. त्या वेळी पोलिसांनी सर्वसामान्यांना वितरीत करावयाचे स्वस्त धान्य, शासकीय वितरण व्यस्थेतील रिकामे पोते आणि ट्रक असा ६९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भाजपचा कार्यकर्ता अरुण म्हस्के याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथकाची स्थापना केली. पथकाने या प्रकरणात पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून मोहन म्हस्के याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. याच प्रकरणात गोदामपाल संजय राजपूत यालाही यापूर्वी अटक झाली. दरम्यान, विशेष तपास पथकाने या प्रकरणात फिर्यादी असलेल्या नायब तहसीलदार अशोक भंडारे याची कसून चौकशी केली असता त्याचाही या काळ्याबाजारात हात असल्याचे समोर आले. त्यालाही पथकाने अटक केली. त्यामुळे या रेशन घोटाळ्यात गेवराईचा पुरवठा विभागही सहभागी असल्याचे समोर आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the ration scam Deputy Tehsildar arrested for bribery