आता पराभुतांची "रिकव्हरी' मोहीम  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता पराभुतांची "रिकव्हरी' मोहीम 

आता पराभुतांची "रिकव्हरी' मोहीम 

औरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष मैदानात असल्याने उमेदवारांनी जिवाचे रान करून प्रचार केला. काहींनी तर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात मागे-पुढे पाहिले नाही. कार्यकर्त्यांनी सांगितलेली रक्कम डोळे झाकून दिली. मात्र ज्यांना पैसे दिले तिथेच घात झाला. ""पाच लाख रुपये दिले, तर अख्खे गाव पॅक करतो... मग एकगठ्ठा मतदान आपलेच! '' असे म्हणून, उमेदवारांकडून अनेकांनी लाखो रुपये उकळले. मात्र शेवटी पराभव झाला. पेट्याच्या-पेट्या देऊन अपेक्षित मतदान न झाल्याने पराभूत उमेदवारांची "सटकली' असून, आता वाटलेल्या पैशांची "वसुली मोहीम' सुरू झाली आहे. आता ऐन मार्चमध्ये वसुली सुरू झाल्याचे "पेटी बहाद्दर' कार्यकर्त्यांना सध्या पळताभुई थोडी झाली आहे. भीतीपोटी कित्येक जणांचे मोबाईल "नॉट रिचेबल' झाले असून, काही कार्यकर्त्यांनी घेतलेली रक्कम परत करण्याची मानसिक तयारी केली आहे. 

30 लाख ते सव्वा कोटींपर्यंत खर्चाचा अंदाज 
शेवटच्या तीन चे चार दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गावागावांत पैशांचा पाऊस पडला. मात्र, कित्येक उमेदवारांना लाखो, कोट्यवधी रुपये खर्चूनही पराभवाला सामोरे जावे लागले. कित्येक उमेदवारांना 30 लाख ते सव्वा कोटींच्या जवळपास खर्च आला आहे. ज्यांच्या जिवावर निवडणूक लढविली, त्यांना लाखोंची बंडले दिली; मात्र त्या तुलनेत मतदान न झाल्याने अनेक उमेदवारांना पराभव जिव्हारी लागला. तर काही उमेदवारांचा निसटता पराभव झाला. ज्यांना पेट्या दिल्या होत्या तेथे मात्र अपेक्षित मतदान झालेच नाही. त्यामुळे चिडलेल्या काही उमेदवारांनी आता सुरू केली आहे वसुली मोहीम! ""पैसे परत करा नाही तर...'' असे फोन खणखणायला लागल्याने अनेक "पेटी'बहाद्दरांची झोप उडाली आहे. आता पैसे द्यायचे कोठून, हा प्रश्‍न त्यांच्यापुढे असून पार्ट्या झोडण्यावर, देशी, विदेशीच्या पेगवर पैसे खर्च झालेले आहे. भाऊ, दादा, अण्णा आम्ही प्रामाणिकपणे काम केले, असे समजून सांगण्याची वेळ आली आहे. 

अनेकांचा प्रचारात दिवसाचा खर्च होता लाखोंवर 
प्रचार साहित्य, गाड्या आणि ओल्या पार्ट्या, तसेच गाव "पॅक' करण्यासाठी उमेदवारांचा खर्च हा दिवसाला लाखोंच्या घरात गेला होता. एका उमेदवाराने एका मोठ्या गावात दहा लाख रुपयांपर्यंत खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकगठ्ठा मते मिळतील, या आशेने उमेदवारांनी ही पैशांची "बंडले' दिली. मात्र, त्या तुलनेत त्यांच्या हाती फक्त "चिल्लर' लागल्याने त्यांचा पराभव झाला. 

पराभूत उमेदवारांचे टेन्शन जाईना 
सध्या "इव्हीएम मशीन'ने मतदान होत असल्याने कोणत्या गावातून व कोणत्या मतदान केंद्रावरून कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली, याची माहिती सहज उपलब्ध होत आहे. निकालाच्या धक्‍क्‍यातून काहीसे सावरल्यानंतर आता पराभूत उमेदवारांनी याची गोळाबेरीज केली आहे. अमुकअमुक गावात तर पैशांचा पाऊस पाडला; मात्र मतदान तर झालेले दिसत नाही, हे लक्षात येताच त्यांनी "गद्दारी' करणाऱ्यांकडून वसुली सुरू केली आहे. संबंधित गावातील पेटीबहाद्दरांशी संपर्क साधला आहे. ""तुम्हाला जी "पेटी' दिली होती ती आता परत करा... नाही तर...'' असा दम मिळाल्यामुळे त्यांना या "पेट्या' परत करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 

जेवढे कमावले तेवढे गेले..अन्‌ कर्ज ही झाले 
काहींनी जणांनी पाच वर्षांत जेवढे कमावले तेवढे ही गेले अन्‌ कर्जही झाले, अशी स्थिती झाली आहे. आपण निवडून येणार याची चांगलीच शाश्‍वती असल्याने अनेकांनी तर दिल खोल के पैसा खर्च करून टाकला. मात्र मतमोजणीच्या दिवशी मतांची आकडेवारी हाती पडताच, त्यांना आपल्यासोबत गद्दारी झाल्याची जाणीव झाली. काही तर बंडखोरी, पक्षांतर करून उमेदवारी लढविली पेट्यांवर पेट्या खर्च केल्या. शेवटी शेवटी सर्व पेट्या रिकाम्या केला मात्र पराभूत झाल्याने आता काही जणांना कर्ज कसे फेडायचे याचे टेन्शन आले आहे.