धार्मिक भावना जपत केली अवघड शस्त्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

औरंगाबाद - ‘यहोवाचे साक्षीदार’ पंथातील एका रुग्णाच्या धार्मिक भावना जपत शासकीय कर्करोग रुग्णालयात त्याच्या जिभेवर नऊ तासांची अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान पंथाच्या नियमानुसार रक्त चढवायचे नव्हते, हे आव्हान डॉक्‍टरांनी पेलले.

औरंगाबाद - ‘यहोवाचे साक्षीदार’ पंथातील एका रुग्णाच्या धार्मिक भावना जपत शासकीय कर्करोग रुग्णालयात त्याच्या जिभेवर नऊ तासांची अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान पंथाच्या नियमानुसार रक्त चढवायचे नव्हते, हे आव्हान डॉक्‍टरांनी पेलले.

जिभेचा कर्करोग झालेल्या एका ४५ वर्षीय रुग्णाला मुंबईहून औरंगाबादेत उपचारासाठी संदर्भित करण्यात आले होते. त्याचा कर्करोग दुसऱ्या टप्प्यातील असल्याने जीभ काढून टाकून त्या ठिकाणी हाताची त्वचा लावण्याची शस्त्रक्रिया करायची होती. त्यासाठी जबडा आणि मानेत असलेल्या अनेक सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांना कौशल्यपूर्णरीत्या हाताळावे लागले. साधारणत: या शस्त्रक्रियेत अचानक कोणतीही वाहिनी दुखावली गेली तर रक्तस्राव होतो. अशावेळी रुग्णाला बाहेरून रक्त द्यावे लागते; मात्र या रुग्णाने त्याच्या धार्मिक नियमानुसार अन्य व्यक्तीचे रक्त चढवू नये, असे डॉक्‍टरांना स्पष्टच सांगितले. कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अजय बोरगावकर यांनी हे आव्हान पेलले आणि रुग्णाचे धार्मिक स्वातंत्र्य जपत रक्तसंक्रमणाशिवाय ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यांना डॉ. केतिका पोटे, डॉ. संजीव कुमार, डॉ. सोनल पाचोरे, डॉ. रमाकांत आलापुरे आणि डॉ. जुनैद यांची मदत मिळाली. यासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. संगीता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

काेण आहेत ‘यहोवाचे साक्षीदार’?
हा एक ख्रिस्ती धर्मातील विशेष पंथ आहे. या पंथाच्या व्यक्ती जवळपास २६ मार्गदर्शक तत्त्वांचे कट्टरतेने पालन करतात. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही स्थितीत या व्यक्तीला बाहेरचे घटक किंवा रक्त देऊ नये, कोणतेही प्रत्यारोपण करू नये असा नियम आहे. मृत्यू ओढावत असला तरीही हा नियम पाळलाच पाहिजे, असे सांगितले जाते.

जिभेच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया करताना रक्त द्यावेच लागते; मात्र रुग्णाला त्याच्या धार्मिक नियमानुसार बाहेरचे घटक वर्ज्य होते. त्यामुळे रक्तस्राव होऊ न देता शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान होते. नऊ तासांत ते आम्ही पेलल्याने आता रुग्ण बरा झाला असून, त्याचा फॉलोअप घेत आहोत. 
-डॉ. अजय बोराळकर.

Web Title: Religious feelings have been preserved in surgery