esakal | बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन
sakal

बोलून बातमी शोधा

4child_20marriage_0

रेणापूर (जि.लातूर) तालुक्यातील दर्जीबोरगाव येथे शेतातील घरात होणार असलेल्या एका १७ वर्षीय मुलीचा बालविवाह तहसील कार्यालय व पोलिस दलाने सोमवारी (ता.३१) सकाळी अकरा वाजता रोखला.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन

sakal_logo
By
सुधाकर दहिफळे

रेणापूर (जि.लातूर) : तालुक्यातील दर्जीबोरगाव येथे शेतातील घरात होणार असलेल्या एका १७ वर्षीय मुलीचा बालविवाह तहसील कार्यालय व पोलिस दलाने सोमवारी (ता.३१) सकाळी अकरा वाजता रोखला. वधु व वरांकडील परिवारांचे समुपदेशन करून हा विवाह मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर करावा, अशी सूचना करून तसा कबुली जबाबही परिवारातील सदस्यांकडून घेण्यात आला.

भरदिवसा शेतकऱ्याची घरफोडी, दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी


तहसीलदार राहूल पाटील यांनी ही माहिती दिली. चाकूर तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीचा विवाह सोहळा सोमवारी सकाळी दर्जी बोरगाव येथील मुलासोबत होणार असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांना मिळाली. याची गंभीर दखल घेत त्यांनी पोलिस निरीक्षक गोरख दिवे, बीट जमादार बाळासाहेब कन्हेरे, मंडळ अधिकारी किसन घोडके व तलाठी उत्तरेश्वर चव्हाण यांना सोबत घेऊन दर्जीबोरगाव गाठले. माहिती मिळालेल्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे वधुवरांचे नातेवाईक जमलेले दिसले. श्री. पाटील यांनी चौकशी केल्यानंतर त्यांना साखरपुड्याच्या कार्यक्रम असल्याची माहिती दिली.

मात्र, अधिक चौकशीत विवाहाची तयारी होत असल्याचे काहींना त्यांना सांगितले. त्यावरुन तहसीलदार पाटील व पोलिस निरीक्षक दिवे यांनी सर्व प्रकार रोखला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मुलीच्या वयाची चौकशी केली. यात मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे समोर आले. यामुळे पाटील व दिवे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार वधुवरांच्या कुटुंबांचे समुपदेशन करून हा विवाह मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर करण्याच्या सूचना केल्या. त्यापूर्वी मुलीचा विवाह केल्यास दोन्ही कुटुंबीयावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतरच विवाह करणार असल्याचा जबाब पोलिसांना दिल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

बालविवाहाची माहिती द्या
कोरोनाच्या काळात लग्न व कार्यक्रमांच्या उपस्थितींवर बंधने आली आहे. याचा फायदा उठवून अनेकजण बालविवाहासारखे गैरप्रकार करताना दिसत आहेत. तालुक्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे तालुक्यात कुठेही असा बालविवाह होत असल्याची त्याची माहिती नागरिकांनी तहसिल कार्यालय व पोलिसांना द्यावी, असे आवाहनही तहसीलदार पाटील यांनी केले आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)

loading image
go to top